जयपूर : भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही आणि विधानसभा निवडणुकीत कोणी एक राजकीय नेता नव्हे, तर ‘कमळ’ हाच भाजपचा चेहरा राहील. राजस्थानच्या विकासाला भारत सरकारचे मोठे प्राधान्य आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चित्तोडगडमध्ये ७२०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
मोदी यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचार आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला.
महिलांवरील गुन्ह्यांवरून काँग्रेसची टीका
भाजप राज्य सरकारे महिलांवरील गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये जबाबदारी कधीच स्वीकारत नाहीत, अशी टीका काँग्रेसने केली. काँग्रेस सरकारे न्याय मिळवून देण्यासाठी तत्परतेने काम करतात, असा दावा पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून कोणालाही सादर करणार नाही, असे स्पष्ट संकेत दिले. ‘कमळ’ चिन्ह हेच पक्षाची आशा आणि उमेदवार असल्याचे मोदींनी म्हटले.
गुन्हेगारी, दंगली, महिलांवरील अत्याचार, दलित आणि मागासवर्गीयांच्या बाबतीत राजस्थान अव्वल आहे. भाजपची सत्ता आल्यास काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या सर्व सार्वजनिक योजना सुरू राहतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.