भोपाळ: मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर हल्लाबोल केला. या टीकेला आता काँग्रेसनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'मोदी वारंवार काँग्रेसवर टीका करतात. काँग्रेसनंच इंग्रजांविरोधात लढा दिला. देशासाठी लढा देणाऱ्या पक्षाला आता मोदी राष्ट्रवाद शिकवणार का?' असा सवाल काँग्रेस नेते कमलनाथ यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक प्रचारातील भाषणांमधून काँग्रेसवर निशाणा साधणाऱ्या मोदींना काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. 'आधी पंतप्रधान मोदी रोजगार आणि शेतकऱ्यांबद्दल बोलायचे. मात्र आता ते जिथे जातात, तिथे राहुल गांधी आणि राष्ट्रवादाबद्दल बोलतात. मोदींना राहुल गांधींची इतकी चिंता कशासाठी? मोदी त्यांच्या छिंदवाडामधील सभेत जवळपास 30 मिनिटं राहुल गांधी आणि राष्ट्रवादाबद्दल बोलले. ज्या काँग्रेसनं इंग्रजांविरोधात लढा दिला, त्यांना आता मोदी राष्ट्रवादाचे धडे देणार का?,' असा सवाल कमलनाथ यांनी उपस्थित केला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या त्यांच्या पक्षातील एका तरी नेत्याचं नाव मोदींनी सांगावं, असं आव्हानदेखील त्यांनी दिलं. कमलनाथ यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनादेखील लक्ष्य केलं. 'मुख्यमंत्री स्वत:ला शेतकऱ्याचा पुत्र म्हणवून घेतात. मात्र राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत,' अशी टीका त्यांनी केली. मध्य प्रदेश आणि आफ्रिका खंडातील शेतकऱ्यांची परिस्थिती सारखीच असल्याचंही ते म्हणाले. राज्य सरकार औद्योगिक आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली.
'मोदीजी, तुमच्या पक्षातल्या एका तरी स्वातंत्र्य सैनिकाचं नाव सांगा'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 2:51 PM