भोपाळ: काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून कमलनाथ यांच्यासोबतच ज्योतिरादित्य सिंधिया यांचं नाव चर्चेत होतं. मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. काँग्रेसनं ट्विट करुन कमलनाथ यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कमलनाथ यांच्या शपथविधीची तारीख आज जाहीर केली जाणार आहे.मध्य प्रदेशात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यापासून मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरू झाली होती. यानंतर बैठकांचं सत्र सुरू झालं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या. यानंतर मध्य प्रदेशच्या नवनिर्वाचित आमदारांचीही बैठक झाली. अखेर कमलनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. ते राज्याचे 18 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मंगळवारी मध्य प्रदेशसह पाच राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाले. यात काँग्रेस मध्य प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसला बहुमतासाठी अवघ्या दोन जागा कमी पडल्या. मात्र त्यांना बसपानं पाठिंबा जाहीर झाला. तेव्हापासून मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेसमध्ये बैठकांचं सत्र सुरू होतं. सर्वात आधी भोपाळमध्ये पर्यवेक्षकांची बैठक झाली. यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया आणि कमलनाथ या दोन प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं. मुख्यमंत्री कोण होणार, याची घोषणा भोपाळमध्येच होईल, अशी माहिती बैठकीतून बाहेर पडताना दोन्ही नेत्यांनी दिली. दोन्ही नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राहुल यांनी त्यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला. यानंतर राहुल यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा नेमकी कोणाकडे सोपवली जाणार, याबद्दलचे संकेत दिले. या फोटोत राहुल दोघांच्या मध्ये उभे आहेत. त्यांनी दोघांचा हात धरला आहे. 'वेळ आणि संयम हे दोन सर्वात मोठे योद्धे आहेत,' हे लियो टॉलस्टॉय यांचं वाक्य त्यांना या फोटोसोबत वापरलं होतं.