भोपाळ : मध्य प्रदेशकाँग्रेसच्या कमलनाथ सरकारची आज होणारी बहुमत चाचणी टळल्यानंतर, मध्य प्रदेशातील भाजप आमदारांनी आज राजभवनात गव्हर्नर लालजी टंडन यांची भेट घेतली. त्यांनी राज्यपालांना लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी अशी विनंती केली. तर यावेळी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांशी बोलताना कमलनाथ सरकारवर निशाणा साधला.
शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले की, कमलनाथ यांच्या सरकारने बहुमत गमावले आहे. त्यामुळे राज्यपालांनी फ्लोर टेस्ट लवकरात लवकर घेण्याचे आदेश सरकारला दिले होते. परंतु मुख्यमंत्री यातून पळ काढत आहे. त्यामुळे राज्यपालांच्या आदेशाचे पालन केले जात नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. तर कमलनाथ सरकार रणछोडदास झाले असून, त्यांना कोरोना व्हायरस सुद्धा वाचू शकणार नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.
तर आज (सोमवार) होणारी कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी होऊ न शकल्याने, शिवराज सिंह चौहान यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह २२ आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ सरकारवर बहुमत चाचणीचे संकट ओढवले आहे.
पक्षीय बलाबल -
विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या ६ आमदारांचा राजीनामा स्वीकारला आहे. एकूण २३० सदस्य संख्या असून यातील २ जागा रिक्त आहे. काँग्रेसकडे १०८, भाजपाकडे १०७, बसपा २, सपा १ आणि अपक्ष ४ आमदार आहेत. सध्या विधानसभेचं एकूण संख्याबळ २२२ आहे. बहुमतासाठी ११२ आमदारांची गरज भासणार आहे. काँग्रेसला ४ आमदारांची गरज आहे. सपा, बसपा आणि अपक्ष मिळून ७ आमदारांचा पाठिंबा काँग्रेसला मिळाला तर सरकार बहुमत सिद्ध करु शकते. अशा परिस्थितीत काँग्रेसकडे ११५ आमदारांचे पाठबळ राहील. मात्र १६ आमदारांचा राजीनामा मंजूर झाल्यास काँग्रेसचं संख्याबळ ९२ इतकं होईल.