नवी दिल्ली - मध्यप्रदेशात निर्माण झालेल्या राजकीय पेचानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. दिल्लीत झालेल्या या बैठकीत सोनिया गांधी आणि कमलनाथ यांच्यात मध्यप्रेदशात निर्माण झालेल्या राजकीय पेचावर चर्चा झाली. काँग्रेसचे सर्व आमदार परतल्याची माहिती कमलनाथ यांनी सोनिया यांना दिली. मात्र त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नाराजी संदर्भातील प्रश्नावर मौन पाळले.
मध्य प्रदेशातील राजकीय पेच मिटविण्यासाठी कमलनाथ मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर कमलनाथ म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि राज्यसभेच्या उमेदवारीसंदर्भात सखोल चर्चा झाली. तसेच मध्यप्रदेश सरकारवर संकट नसून सर्व आमदार परतल्याची माहिती आमपण सोनिया गांधी यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसनेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नाराजीसंदर्भात कमलनाथ यांना विचारण्यात आले. त्यावर कमलनाथ यांनी मौन पाळले. शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून कमलनाथ सरकारवर नाराज असल्याचे सांगण्यात येते.
मध्यप्रदेश विधानसभेत काँग्रेसकडे पूर्ण बहुमत नसून बाहेरून पाठिंबा मिळून कमलनाथ सरकारचा गाडा सुरू आहे. यामध्ये सपा, बसपा आणि अपक्ष आमदारांची काँग्रेसला साथ आहे. मात्र नाराजीतून सरकारमधील आठ आमदार गायब झाले होते. ते सर्व आठ आमदार परतले असून सर्व नाराज आमदारांची नाराजी दूर करणार असल्याचे कमलनाथ यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळात सहा आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.