मुंबई - मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात लावण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काँग्रेस सरकारने काढल्यामुळे अनेक शिवप्रेमी कार्यकर्ते नाराज झाले आहेत. काही हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी छिंदवाडा-नागपूर हायवे रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शिवरायांचा अपमान केल्यामुळे परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती.
या आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की, मध्य प्रदेश सरकारने जाणूनबुजून शिवाजी महाराजांची मूर्ती हटवली. मात्र मूर्ती स्थापन करण्याची कोणतीही परवानगी न घेतल्याने ही कारवाई केल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यामध्ये काही अधिकारी पोलीस प्रशासनाच्या मदतीने बुलडोझरच्या सहाय्याने शिवाजी महाराजांची मूर्ती असलेला चौथरा तोडताना दिसत आहे.
मात्र या कारवाईमुळे भाजपाने शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे गौरव आणि आराध्य दैवत आहेत. त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. जर कोणालाही आक्षेप असता तर सन्मानपूर्वक मार्गाने हा चौथरा हटवू शकत होते मात्र मध्य प्रदेश सरकारला महापुरुषांचा अपमान करणे गर्वाचे वाटते असा आरोप माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केला आहे.
त्याचसोबत शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला सहन होईल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर महाराष्ट्र भाजपानेही याबाबत व्हिडीओ पोस्ट करुन शिवसेना-काँग्रेसवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्यप्रदेश मधील पुतळा पाडण्याचा प्रयत्न करून काँग्रेसने महाराजांबद्दल आपले 'प्रेम' दाखवलेलेच आहे. आता वेळ आहे शिवसेनेची!! त्यांना महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
छिंदवाडा येथील मोहगावच्या चौकात शासकीय जमिनीवर ही मूर्ती लावण्यात आली होती. मात्र प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती म्हणून प्रशासनाने २४ तासात ही मूर्ती हटवून कारवाई केली. ही बातमी परिसरात पसरल्यामुळे नाराज झालेल्या शिवप्रेमींनी विरोध प्रदर्शन करत रास्ता रोको केला. मात्र १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांची प्रतिमा स्थापन करण्यात येईल असं आश्वासन दिल्याने हे आंदोलन थांबले.