भाजपामध्ये प्रवेश करण्यावर कमलनाथ यांनी सोडलं मौन; म्हणाले, "अशी गोष्ट असेल तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 05:08 PM2024-02-17T17:08:08+5:302024-02-17T17:15:37+5:30
भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर कमलनाथ यांची आता पहिली प्रतिक्रिया आली आहे.
भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर कमलनाथ यांची आता पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. "जर अशी काही गोष्ट असेल तर मी तुम्हाला सर्वप्रथम सांगेन" असं त्यांनी एबीपी न्यूजला सांगितलं आहे. कमलनाथ हे छिंदवाडा येथील आपला कार्यक्रम सोडून दिल्लीत पोहोचले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारीला कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ हे देखील भाजपामध्ये प्रवेश करू शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थकांनी दावा केला की कमलनाथ यांच्यासोबत 10 ते 12 आमदारही काँग्रेस सोडू शकतात. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून काँग्रेस हटवलं आहे. कमलनाथ यांच्या निकटवर्तीय सज्जन वर्मा यांनीही ट्विटर अकाऊंटवरून काँग्रेसचा लोगो काढून टाकला आहे.
याआधीही कमलनाथ हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी ही चर्चा पूर्णपणे फेटाळून लावली होती. नऊ वेळा खासदार, दोन वेळा आमदार, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष कमलनाथ यांची ओळख दिग्गज नेते म्हणून केली जाते. यावेळी पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवावे, अशी कमलनाथ यांची इच्छा होती, पण तसं होऊ शकले नाही. काँग्रेसने अशोक सिंह यांना उमेदवारी दिली.
काय म्हणाले दिग्विजय सिंह?
काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना कमलनाथ यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, "ते भाजपामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. जी व्यक्ती नेहमीच गांधी-नेहरू कुटुंबाच्या पाठीशी उभी राहिली आहे, ती व्यक्ती भाजपामध्ये कशी जाऊ शकते?" दिग्विजय यांनी कमलनाथ यांच्याशी काल रात्रीच चर्चा झाल्याचं सांगितलं.