भोपाळ - ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी आणि २० हून अधिक शिंदे समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाळीमुळे मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या घडामोडींमुळे राज्यातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्याच जमा असल्याचे मानले जात आहे. मात्र राज्यातील सरकार टिकवण्याबाबत काँग्रेस अद्यापही आशावादी आहे. अनेक आमदारांनी बंडखोरी केली असली तरी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मास्टरस्ट्रोक अद्यापही कायम आहे, त्याच्या जोरावर राज्यातील सरकार वाचवण्यात यश येईल अशा विश्वास काँग्रेसला आहे.
एकीकडे राजीनामा देऊन पक्ष सोडणाऱ्या काँग्रेस आमदारांची संख्या ३० पर्यंत पोहोचेल, असा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. मात्र काँग्रेसकडून हा दावा खोडून काढण्यात येत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते पी सी शर्मा म्हणाले की, ‘निश्चितपणे एक नवी माहिती तुमच्यासमोर येईल. संध्याकाळपर्यंत तुम्हाला कमलनाथ यांचा मास्ट्ररस्ट्रोक पाहायला मिळेल.’
पी सी शर्मा यांच्या या वक्तव्यानंतर सरकार टिकवण्यासाठी काँग्रेस कुठला मास्टरस्ट्रोक खेळू शकते याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचे राजीनामे घेऊन काही नाराज आमदारांना मंत्रिपद देऊन त्यांना पक्षात परत आणण्याची खेळी खेळण्याची तयारी कमलनाथ यांनी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कमलनाथ हे आपल्या काही निकटवर्तीय नेत्यांच्या माध्यमातून काही बंडखोर आमदारांच्या संपर्कात आहेत. तसेच त्या माध्यमातून वाटाघाटी होत आहेत, असे सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
Video: राजीनाम्यानंतर ज्योतिरादित्यांनी मौन सोडले; पण फक्त दोनच शब्द बोलले
ज्योतिरादित्य शिंदेंना भाजपाकडे वळवण्यात या राजघराण्याने बजावली महत्त्वाची भूमिका
ज्योतिरादित्य शिंदेंच्या आत्या म्हणतात, ही तर त्यांची घरवापसी!
दरम्यान, काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसेच ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही तातडीनं बैठक बोलावली. त्यातच सकाळी मोदी आणि शहांच्या घेतलेल्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपा प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. 18 वर्षांचा प्रवास मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे. आता एक नवीन सुरुवात करायची आहे, असेही ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपला राजीनामा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे सोपवला आहे.