भोपाळः मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात लावण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काँग्रेस सरकारने जेसीबी लावून पाडली आहे. त्यामुळे अनेक शिवप्रेमी कार्यकर्ते नाराज झाले आहेत. काही हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी छिंदवाडा-नागपूर हायवे रास्ता रोको आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे गौरव आणि आराध्य दैवत आहेत. त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. जर कोणालाही आक्षेप असता तर सन्मानपूर्वक मार्गाने हा चौथरा हटवू शकत होते, मात्र मध्य प्रदेश सरकारला महापुरुषांचा अपमान करणे गर्वाचे वाटते, असा आरोप माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केला आहे. त्याचसोबत शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला सहन होईल का?, त्यांना महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस? असा सवाल महाराष्ट्र भाजपानं उपस्थित केला आहे. आता संभाजीराजे छत्रपतींनी या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं. मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारने व पक्षाच्या अध्यक्षांनी याचा त्वरित खुलासा करावा. जनाक्रोश एवढा जास्त आहे, की त्याची झळ त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी दिला आहे. मूर्ती काढावीच लागणार होती, तर त्याची पद्धत सन्मानजनक ही करता आली असती. असल्या क्रूर पद्धतीने हटवून तुम्ही नेमकं काय सिद्ध करू पाहत आहात? असे कृत्य छत्रपतींचा वंशज म्हणून कदापिही सहन करू शकत नसल्याचंही संभाजीराजेंनी अधोरेखित केलं आहे.
Video: छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला; भाजपाचा काँग्रेस शिवसेनेवर हल्ला