अभिलाष खांडेकरभोपाळ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमल नाथ यांनी मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. नाथ यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून त्यांची जबाबदारी ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे निकटचे डॉ. गोविंद सिंह यांना दिली गेली आहे. नाथ हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही असून ही जबाबदारी त्यांच्याकडेच राहील.
पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी डॉ. गोविंद सिंह यांना नाथ यांची जबाबदारी दिली आहे. कमल नाथ यांच्या नेतृत्वाखालील १५ महिने जुने सरकार मार्च २०२० मध्ये पडल्यापासून पक्षात वेगवेगळ्या गटात एक व्यक्ती-एक पद ही चर्चा होत होती. विधानसभेतील नाथ यांची कामगिरीही फार काही प्रभावी नव्हती आणि भाजप व काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते नाथ व शिवराज सिंह चौहान हे जवळचे मित्र असल्याची दबक्या आवाजात चर्चाही करायचे.
राज्याच्या राजकारणात आपले काही स्थान आहे याचे संकेत दिग्विजय सिंह यांनी गोविंद सिंह यांच्या नियुक्तीने दिलेले आहेत. दोन महिन्यांपूर्वी दिग्विजय सिंह यांच्या अनुयायी विभा पटेल महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी अर्चना जैस्वाल यांच्या जागी नियुक्त केल्या गेल्या. अर्चना जैस्वाल या नाथ यांच्या समर्थक होत्या. पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी नाथ यांना तुमचा राजीनामा पक्षाच्या अध्यक्षांनी स्वीकारल्याचे कळवले. कमल नाथ हे भोपाळमध्ये जास्त वेळ देत नसल्यामुळे पक्ष तसाही राज्यात फार काही सक्रिय नाही. राज्य विधानसभेची निवडणूक २०२३च्या शेवटी होणार असून पक्षाने सहा महिने आधी या निवडणुकीची तयारी सुरू केली, असे नाथ नुकतेच म्हणाले होते.
पक्षश्रेष्ठींकडे तक्रारीपक्षातील मोठ्या संख्येतील कार्यकर्ते नाथ यांच्या कार्यपद्धतीवरून असमाधानी होते आणि त्यांच्या निष्क्रियतेच्या तक्रारीही त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्या होत्या, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मान्य केले.