सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- पक्षाचे राष्ट्रीय महासचिव गुरुदास कामत काँग्रेसचे अविभाज्य घटक असून, कोणत्याही स्थितीत त्यांच्यासारख्या नेत्याला आम्ही गमावणार नाही. कामतांंच्या नाराजीची जी काही कारणे असतील, त्याबाबत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी त्यांच्याशी चर्चा करतील आणि हे मळभ लवकरच दूर होईल, असा खुलासा पक्षप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुदास कामत यांची समजूत घालण्याची विशेष जबाबदारी सोनिया गांधींनी अहमद पटेल यांच्यावर सोपवली आहे.मुंबई काँग्रेसमधील संजय निरूपम यांची मनमानी हे कामत यांच्या राजीनाम्याचे महत्त्वाचे कारण असले तरी संघटनेत महाराष्ट्र व मुंबईचे प्रभारी सरचिटणीस मोहन प्रकाश यांच्या हस्तक्षेपाला मुंबईसह राज्यातील काँग्रेसजन कंटाळले आहेत. महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा पराभव होत असूनही संघटनेत विविध पदांचे लिलाव होत असल्याच्या तक्रारी आहेत. कामत यांनी या तक्रारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधींच्या कानावर घातल्या होत्या, असे समजते. तथापि त्यानंतरही मुंबई अथवा महाराष्ट्राच्या संघटनात्मक कामकाजात कोणताही दृश्य बदल होत नव्हता.काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधींकडे सोपवण्याचा मुहूर्त उजाडण्याआधीच पक्षात बेदिलीचा माहोल पसरला आहे. जून महिन्याच्या मध्यावर राहुल गांधींकडे अध्यक्षपद सोपवले जाईल आणि संघटनेतही मोठे फेरबदल होतील याचे सुतोवाच सुरू होताच, काही विद्यमान सरचिटणीसांनी राजीनामे देण्याची इच्छा सोनिया गांधींकडे व्यक्त केली. गुजरात व राजस्थानचे प्रभारी कामत त्यात आघाडीवर होते. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून सोनिया गांधींनी कामत यांच्याकडे राजस्थान व गुजरातचे प्रभारीपद सोपवले होते. या दोन्ही राज्यांतील काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांत कामत यांनी जान आणली. प्रत्येक जिल्ह्यात फिरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना यश मिळवून दिले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे दोन्ही राज्यात काँग्रेसची स्थिती सुधारत आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधींनी कामत यांच्या कार्यशैलीची जाहीर तारीफही केली होती. त्याचवेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम मात्र पक्ष संकटात असूनही कामत यांच्या सहकारी कार्यक र्त्यांचे पंख छाटत सुटले होते. कामतांच्या लोकसभा मतदारसंघातही निरुपम यांनी हस्तक्षेप सुरू केल्यानंतर ते संतापले होते. यासंबंधी अनेकदा तक्रारी करूनही आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच कामत यांनी राजीनामाअस्त्र परजून झटका दिला. >दिग्गजांनाही खडबडून जाग कामत यांच्या राजीनामा प्रकरणामुळे राहुल गांधींभोवती घोटाळणारे नेते व पक्षातल्या दिग्गजांनाही खडबडून जाग आली असून, त्याची गांभीर्याने दखल पक्षाच्या पुनर्रचनेत घेतली जाते की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कामत पुन्हा पक्षात येणार का, हे आताच सांगणे अवघड आहे. मात्र ते आले वा न आले तरी पक्ष संघटनेत मोठे बदल अपेक्षित असून, त्यात तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क असलेल्या नेत्यांनाच महत्त्व मिळेल, असे दिसते.