लखनऊ: हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. अशफाक आणि मोईनुद्दीन अशी आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपींना गुजरात-राजस्थान सीमेवरुन गुजरात एटीएसनं बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. याआधी तीन आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली होती. त्यांना लखनऊ कोर्टात हजर करण्यात आलं होतं. या तिघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुजरात एटीएसचे डीआईजी हिमांशु शुक्ला यांच्या नेतृत्त्वाखाली एसपी बी. पी रोजिया, एसीपी बी. एस. चावडा आणि अन्य अधिकाऱ्यांनी कमलेश तिवारी यांच्या हत्या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना अटक केली. आरोपी अशफाक सूरतच्या लिंबायतमधील ग्रीन व्ह्यू अपार्टमेंटमध्ये राहतो. तर मोईनुद्दीन खुर्शीद पठाण उमारवाड्यातल्या लो कास्ट कॉलनी रहिवासी आहे. अशफार पेशानं मेडिकल रिप्रेंझेटेटिव्ह असून मोईनुद्दीन फूड डिलिव्हरी बॉय आहे. गुजरात एटीएसनं दिलेल्या माहितीनुसार, अशफाक आणि मोईनुद्दीनला गुजरात-राजस्थान सीमेवरुन अटक करण्यात आली. लखनऊमध्ये 18 ऑक्टोबरला कमलेश तिवारींची हत्या झाली होती. त्या प्रकरणात अशफाक आणि मोईनुद्दीनची नावं समोर आली होती. कमलेश तिवारींच्या प्रक्षोभक भाषणांमुळे त्यांची हत्या केल्याचं दोघांनी प्राथमिक चौकशीत सांगितलं. सध्या दोन्ही आरोपी गुजरात एटीएसच्या ताब्यात आहेत. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यावर त्यांना उत्तर प्रदेशांकडे सोपवण्यात येणार आहे.