Kanchanjunga Express Accident : पश्चिम बंगालमध्ये मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून ६० प्रवासी जखमी झाले आहेत. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास न्यू जलपाईगुडी येथे मालगाडीने धडक दिल्यानंतर कांचनजंगा एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. दरम्यान या दुर्घटनेतील बचावकार्य पूर्ण झाले असून रेल्वे प्रशासनाने या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आठ जणांचे बळी घेणाऱ्या या घटनेचे कारण आता समोर आलं आहे.
पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी येथे मालगाडी आणि कांचनजंगा एक्स्प्रेस यांच्यात झालेल्या धडकेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० जण जखमी झाले आहेत. मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. आता रेल्वेच्या लोको पायलटने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. कांचनजंगा रेल्वे दुर्घटनेवर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा आणि सीईओ जया वर्मा सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मालगाडीच्या चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पॅकांचनजंगा एक्स्प्रेसच्या मागील बाजूच्या गार्डच्या डब्याचे पूर्णपणे नुकसान झाले. या अपघातात मालगाडीचा चालक आणि कांचनजंगाच्या गार्डचाही मृत्यू झाला. "या दुर्घटनेत मानवी चूक असल्याचे दिसते. सिग्नलकडे दुर्लक्ष करून ट्रेन पुढे चालवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आम्हाला 'कवच' यंत्रणा वाढवावी लागेल, त्यामुळे गाड्यांची टक्कर टाळता येईल," असे रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा जया वर्मा यांनी सांगितले.
"या अपघातात प्रथमदर्शनी मानवी चूक असल्याचे समोर आलं आहे. मात्र तपास पूर्ण झाल्यानंतरच योग्य माहिती कळेल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, मिशन मोडमध्ये कवचचा विस्तार केला जात आहे," असेही जया वर्मा म्हणाल्या.
कसा झाला अपघात?
त्रिपुरातील आगरतळा येथून कोलकात्याच्या सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने मागून धडक दिली. मालगाडीने सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि न्यू जलपाईगुडी स्थानकापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर रंगपानी स्टेशनजवळ उभ्या असलेल्या कांचनजंगा एक्स्प्रेसला मागून धडक दिली. मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. या घटनेत तीन रेल्वे कर्मचारी आणि पाच प्रवाशांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने कांचनचंगा एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीला धडक बसल्याने मोठी जिवित हानी झाली नाही.