चेन्नई - शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे बुधवारी सकाळी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. कामकोटी पीठाचे ते 69 वे शंकराचार्य होते. सकाळी त्यांनी श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना लगेच कांचीपूरमच्या एबीसीडी रुग्णालयात हलवण्यात आले. जयेंद्र सरस्वतींना रुग्णालयात आणले तेव्हा ते बेशुद्धावस्थेत होते. त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता. डॉक्टरांनी त्यांची ह्दयक्रिया सुरु करण्याचे पूर्ण प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
गुरुवारी सकाळी आठ वाजता जयेंद्र सरस्वती यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. जयेंद्र सरस्वतींचे मूळ नाव सुब्रमण्यन महादेव अय्यर होते. तिरुवरुर जिल्ह्यातील इरुलनीकी गावात 1935 साली त्यांचा जन्म झाला. मठाचे 68 वे शंकराचार्य चंद्रशेखरेंन्द्र सरस्वती यांनी 22 मार्च 1954 साली सुब्रमण्यन यांना कांची मठाच्या पीठाधीपती पदावर नियुक्त केले. चंद्रशेखरेंन्द्र यांनीच सुब्रमण्यन यांना जयेंद्र सरस्वतीचे हे नाव दिले.
कांची मठाकडून अनेख शाळा आणि रुग्णालये चालवली जातात. जयेंद्र सरस्वती यांनी 1983 साली शंकर विजयेंद्र सरस्वती यांना मठाचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. वरदाराजा पेरुमल मंदिराचे व्यवस्थापक शंकररामन यांच्या हत्ये प्रकरणी जयेंद्र सरस्वती आणि त्यांचे उत्तराधिकारी विजयेंद्र सरस्वती यांना अटक झाली होती. 2004 साली दिवाळीच्या दिवशी जयेंद्र सरस्वतींना अटक झाली होती. 2013 साली स्थानिक न्यायालयाने त्यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली.