नवी दिल्ली - अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) ची गेल्या कित्येक दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा कंगना आपल्या ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. काँग्रेस आमदाराला कंगनाने सणसणीत टोला लगावला आहे. मध्य प्रदेश बैतूलच्या मुलताई विधानसभेचे काँग्रेस आमदार (Congress MLA) सुखदेव पानसे (Sukhdeo Panase) यांच्यावर तिने हल्लाबोल केला आहे. पानसे यांनी कंगनाला नाचणारी आणि गाणारी म्हटलं होतं. यावर कंगनाने "आपण कंबर हालवत नसून थेट हाडं तोडते" असल्याचं म्हणत निशाणा साधला आहे.
कंगना राणौतने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "हा जो कोणी मुर्ख आहे, याला नाही माहिती की मी दीपिका, कतरीना किंवा आलिया भट्ट नाही. मी एकटी आहे, जिने आयटम नंबर करण्यास नकार दिला. मी मोठे अभिनेते खान आणि कुमार यांच्यासोबत सिनेमे करण्यासही नकार दिला होता. याच कारणामुळे पूर्ण बॉलिवूड गँग, महिला आणि पुरुष सगळेच माझ्या विरोधात आहेत. मी एक राजपूत महिला आहे. जी कंबर हालवत नाही तर थेट हाडं मोडते" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आमदार सुखदेव पानसे यांनी नुकतंच अभिनेत्री कंगना राणौतबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी कलेक्टरच्या समोरच कंगनाला नाचणारी-गाणारी म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी सारनीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते कंगनाच्या आगामी धाकड सिनेमाचं चित्रिकरण थांबवण्यासाठी पोहोचले होते. यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. या लाठीचार्जनंतर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.
पानसे याच घटनेचा विरोध करण्यासाठी रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी निवेदन देताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडली. तसेच कंगनाला नाचणारी आणि गाणारी म्हटलं होतं. पानसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांनी कंगनाच्या हातची कठपुतली बनायला नको. कारण सरकारं येत जात राहातात असं म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी कंगानाने शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त ट्विट केलं होतं.