पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ( Kangana Ranaut ) हिनं वादग्रस्त विधान केलं आहे. ''आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं,''असं तिचं ते विधान होतं. तिच्या या विधानावर अनेकांनी टीका केली, परंतु मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी या वादात उडी घेतली आहे. कंगना जे बोलली ते खरं आहे, ती जे बोलली मी त्याचं समर्थन करतो, असे विक्रम गोखले म्हणाले. अनेक राजकीय मंडळींनी कंगनावर टीका केली आहेत. त्यात ९१ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक नीला चितळे ( Nila Chitale) यांनी त्या विधानावरून कंगनाला धारेवर धरले.
त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या म्हणतात,''वयाच्या बाराव्या वर्षी मी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. तेव्हा पोलिसांनी आम्हाला पकडून दिवसभर पोलीस चौकीत बसवून ठेवले होते. स्वातंत्र्यासाठी माझा भाऊ आणि आई तुरुंगात गेले होते. असं असताना कंगनाचे वक्तव्य पाहून संताप येतोय.''
''स्वातंत्र्यलढ्याच्या संग्रामात सर्व जाती-धर्माच्या लोकांनी भाग घेतला होता. माझा भाऊ साडेतीन वर्ष तुरुंगात होता, यावेळी एका मुस्लीम कुटुंबाने आम्हाला मदत केली होती. स्वातंत्र्यलढ्यासाठी आम्ही इतकं सारं भोगलं असताना जेव्हा ती बाई वादग्रस्त विधान करते तेव्हा मला संताप आला, तिच्या वक्तव्याचा मी निषेध करते,'' असेही त्या म्हणाल्या.
''तिला समज देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात. पंतप्रधानांना माझी विनंती आहे की त्यांनी जाहीरपणे राष्ट्राला सांगावं की त्यांनी तिला समज दिली आहे. अशा प्रकारे वक्तव्य करणे म्हणजे देशद्रोह होय. तरुणांमध्ये चुकीचा गैरसमज पसरू नये म्हणून तिच्यावर कारवाई व्हायलाच हवी. लोकशक्तीचा कंगनाकडून अपमान आणि तो माझ्यासारखी स्वातंत्र्यसैनानी विसरू शकत नाही,''अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.