बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आता केवळ अभिनेत्रीच नाही तर राजकारणी देखील आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर ती खूपच जास्त व्यस्त झाली आहे. ती इतकी व्यस्त आहे की, तिला तिच्या चित्रपटातील कामासाठी वेळच देता येत नाही. आता तिने स्वतःच कबूल केलं आहे की खासदार होणं हे खूप मोठं काम आहे. यामुळे तिला या दोन्ही भूमिका साकारताना त्रास होत आहे.
कंगना राणौतने व्हरायटीला दिलेल्या मुलाखतीत तिला दोन्ही भूमिका साकारताना येणाऱ्या अडचणींबद्दल खुलासा केला आहे. खासदार असणं हे खूप मोठं काम आहे. विशेषतः माझ्या मतदारसंघात. आमच्या इथे पूर आला आहे. म्हणूनच मी सर्वत्र उपस्थित राहत आहे. मला हिमाचलला जावे लागेल आणि परिस्थिती ठीक आहे की नाही ते पाहावं लागेल असं म्हटलं आहे.
पुरामुळे झालेल्या विध्वंसामुळे कंगना रणौतचे आधीच व्यस्त शेड्यूल आणखी व्यस्त झाले आहे. अभिनेत्रीला चित्रपटसृष्टीतील तिच्या वचनबद्धतेसह खासदार म्हणून तिच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. तिच्या राजकीय कारकिर्दीचा परिणाम तिच्या चित्रपटातील कामावर स्पष्टपणे दिसून येतो. प्रोजेक्टवर परिणाम होत असल्याचं तिने स्वतः मान्य केलं आहे.
कंगना राणौत पुढे म्हणाली की, माझ्या चित्रपटातील कामावर परिणाम होत आहे. माझे प्रोजेक्ट वाट पाहत आहेत. मी माझं शूटिंग सुरू करू शकत नाही. आता माझ्या आयुष्यात खूप काही घडत आहे. 'तनू वेड्स मनू' या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. आधीच्या दोन्ही चित्रपटांमध्ये कंगनाने दमदार अभिनय केला होता. गेल्या वर्षी कंगनाने या प्रोजेक्टमध्ये तिच्या सहभागाची पुष्टी केली होती, परंतु दिग्दर्शक आनंद एल राय यांनी नुकतेच एक अपडेट दिलं आहे.