प्रसिद्ध गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन केलेल्या विधानाची सध्या चर्चा होत आहे. २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्याची आठवण करून देत जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला. या विधानानंतर त्यांना देशभरातून व्यापक पाठिंबा मिळत आहे. तसेच जावेद अख्तर यांच्याविरोधात नेहमीच आक्रमक भाषेत टीका करणाऱ्या कंगना राणौत हिनेही जावेद अख्तर यांचं कौतुक केलं आहे. तसेच त्यांचं कौतुक करण्यासाठी तिने एक खास पोस्टही लिहिली आहे.
कंगाना राणौत हिने जावेद अख्तर यांचं कौतुक करताना लिहिलेल्या पोस्टमध्ये कंगना म्हणते की, जेव्हा मी जावेद साहेबांच्या कविता ऐकते तेव्हा त्यांच्यावर माता सरस्वतीची कृपा असल्याचे जाणवते. जय हिंद जावेद अख्तर साहेब. घरात घुसून मारलं. हा...हा..हा... कंगना हिनं जावेद अख्तर यांचं केलेलं कौतुक पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण जावेद अख्तर आणि कंगना राणौत यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. हा संपूर्ण वाद विसरून तिने जावेद अख्तर यांचं तिने ज्या प्रकारे कौतुक केलं ते पाहून युझर्सनी तिचं कौतुक केलं आहे.
फैज फेस्टिव्हल 2023 मध्ये जावेद अख्तर यांनी मुंबईवरील हल्ल्यावरून पाकिस्तानला खडेबोल सुनावले. ते म्हणाले की, 'आम्ही नुसरत आणि मेहदी हसनसाठी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पण तुमच्या देशात लता मंगेशकर यांच्यासाठी कोणताही कार्यक्रम झाला नाही. जाऊद्या...आता एकमेकांना दोष देऊन फायदा नाही. आम्ही मुंबईचे लोक आहोत, आमच्या शहरावर हल्ला झालेला आम्ही पाहिला आहे. ते लोक नॉर्वेमधून किंवा इजिप्तमधून आले नव्हते. ते लोक अजूनही तुमच्या देशात फिरत आहेत. त्यामुळे ही तक्रार प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल, तर तुम्हाला वाईट वाटण्याचे काम नाही,' असे जावेद अख्तर म्हणाले.