Kangana Ranaut : "सरकार कधीही जाऊ शकतं, मला असे राजपुत्र..."; कंगना राणौतचा काँग्रेसवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 05:42 PM2024-04-11T17:42:54+5:302024-04-11T18:05:33+5:30
Kangana Ranaut And Lok Sabha Election 2024 : मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार कंगना राणौत हिने हिमाचल प्रदेश सरकारचे मंत्री आणि काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हिमाचल प्रदेश लोकसभा निवडणुकीत मंडीची जागा सध्या चर्चेत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. याच दरम्यान, मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार कंगना राणौत हिने हिमाचल प्रदेश सरकारचे मंत्री आणि काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपाची उमेदवार कंगना राणौतनेकाँग्रेस नेते विक्रमादित्य यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. "मला असे राजपुत्र सर्वत्र मिळाले आहेत. मी चित्रपटसृष्टीत देखील अनेक राजपुत्रांनाही भेटले, ज्यांच्या विरोधात मी मुंबईतही आवाज उठवला. या राजपुत्रांनी मला नाही, तर मीच त्यांना माझ्या चित्रपटातून गायब केलं आहे. नवीन आणि बाहेरच्या लोकांना संधी दिली पाहिजे" असं कंगनाने म्हटलं आहे.
#WATCH | Kullu, Himachal Pradesh: BJP Lok Sabha Candidate from Mandi Kangana Ranaut says, "New people and outsiders should be given a chance. In the film industry also, I had to struggle with dynasties. They (the INDIA alliance) are not able to decide on their candidate. They… pic.twitter.com/6b0jIeKs7A
— ANI (@ANI) April 11, 2024
"चित्रपट क्षेत्रातही मला घराणेशाहीचा सामना करावा लागला. इंडिया आघाडी आपल्या उमेदवाराबाबत निर्णय घेऊ शकलेली नाही. ते घाबरलेले दिसतात. त्यांच्याकडे कोणताही राजकीय मुद्दा उरलेला नाही. जर ते घाबरले नसते तर त्यांनी महिलांवर अशोभनीय टिप्पणी केली नसती. मला नेहमीच घराणेशाहीच्या राजकारणाला सामोरे जावे लागले आहे आणि मला येथेही त्याचा सामना करावा लागेल असे दिसते. येथेही त्यांचं सरकार कोसळताना दिसत आहे. त्यांचं सरकार कधीही जाऊ शकतं" असं कंगनाने म्हटलं आहे.
काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह राजघराण्यातील आहेत. ते हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह आणि दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आहेत. हिमाचल सरकारमधील मंत्री आणि प्रतिभा सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांचा मंडीच्या जागेसाठी विचार केला जात आहे. लवकरच काँग्रेस या जागेवर नाव जाहीर करू शकते, असे सांगण्यात येत आहे. प्रतिभा सिंह यांचे पती वीरभद्र सिंह हे पाच वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते मंडी मतदारसंघातून खासदारही राहिले आहेत.