बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडते. कंगनाला राजकारणात येण्याबाबत अनेकदा प्रश्न विचारले जातात. मात्र आत्तापर्यंत ती ते नाकारत आली होती. मात्र यावेळी तिने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. कंगना नुकतीच गुजरातमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ द्वारका येथील जगत मंदिराला भेट देण्यासाठी गेली होती. द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेतलं.
अभिनेत्रीने नागेश्वर महादेव मंदिरात जाऊन देवाचे आशीर्वाद घेतले. देवाचे दर्शन घेतल्यानंतर अभिनेत्रीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. भगवान श्रीकृष्णाची कृपा झाली तर लोकसभा निवडणूक लढवेन असं म्हटलं आहे. द्वारकेबाबत कंगना म्हणाली, द्वारका शहर हे एक दिव्य शहर आहे, असं मी नेहमी म्हणते. येथे सर्व काही आश्चर्यकारक आहे, द्वारकाधीश प्रत्येक कणात विराजमान आहे आणि द्वारकाधीशचे दर्शन होताच आपल्याला धन्य वाटतं.
सरकारने अशा सुविधा द्याव्यात की लोक पाण्याखाली असलेल्या द्वारकेच्या आत जाऊन पाहू शकतील. आपली जी महान नगरी आहे, भगवान श्रीकृष्णाची नगरी, ती आपल्यासाठी स्वर्गाहून कमी नाही. आपल्या आगामी चित्रपटांबाबत अभिनेत्री म्हणाली की, माझा आगामी चित्रपट इमर्जन्सी येत आहे, ज्याचं दिग्दर्शन आणि अभिनय मी स्वत: केलं आहे. त्याशिवाय, एक थ्रिलर आहे. तुम्हा सर्वांना आवडलेला तनु वेड्स मनूचा तिसरा भाग देखील येत आहे.
राम मंदिरावर कंगना म्हणाली, 600 वर्षांच्या संघर्षानंतर भारताला हा दिवस पाहायला मिळत आहे हे भाजपा सरकारचे काम आहे. आम्ही मोठ्या थाटामाटात मंदिराची पुनर्स्थापना करू, हा सनातनसाठी मोठा उत्सव आहे. सनातनचा झेंडा जगभर फडकेल अशी आशा आहे. कंगना या इमर्जन्सी चित्रपटात इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.