हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाची उमेदवार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत सतत प्रचारात व्यस्त आहे. मंगळवारी कंगना प्रचारासाठी चंबा जिल्ह्यातील पांगी या दुर्गम भागात पोहोचली. येथे तिने तिचे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पांगी येथील जाहीर सभेला संबोधित करताना कंगनाने काँग्रेस आणि विक्रमादित्य सिंह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
रॅलीदरम्यान कंगना राणौतने मंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांना खोचक टोला लगावला आहे. "यांच्यापेक्षा भ्रष्ट कोणी नाही. त्यांना जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी आहे. मी तुमच्यासारखी नाही, विक्रमादित्य, जे आपल्या आई-वडिलांच्या नावाने मत मागत आहेत"
"मी पद्मश्री आहे, एक चित्रपट निर्माती आहे, मी स्वतःचं काम स्वत:च करते. मी स्वतःचे पैसे कमावते, मी जनतेचे पैसे घेत नाही. मी त्यांचे पैसे खर्च करत नाही, मी त्या पैशांकडे पाहत देखील नाही" असं कंगना राणौतने म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना कंगना म्हणाली की, "एकीकडे ही भ्रष्ट काँग्रेस आहे आणि दुसरीकडे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ज्यांच्या चारित्र्यावर एकही डाग नाही. आजपर्यंत त्यांनी एक पैसाही आपल्या हातात ठेवला नाही. एवढ्या वर्षात त्यांच्या नावावर एक घोटाळा असेल तर सांगा.”
कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
राजकारणावर मोकळेपणाने विचार मांडणाऱ्या कंगना राणौतचा जन्म हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात 23 मार्च 1987 रोजी झाला. कंगना राणौतची एकूण संपत्ती ही निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात 90 कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं आहे. कंगना राणौतकडे 2 लाख रुपये रोख आहेत आणि तिची सर्व बँक खाती, शेअर्स-डिबेंचर्स आणि दागिन्यांसह एकूण जंगम मालमत्ता 28,73,44,239 रुपये आहे. तर स्थावर मालमत्ता 62,92,87,000 रुपये आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, 6 किलो 700 ग्रॅम सोनं आणि दागिने आहेत, ज्याची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे 60 किलो चांदी आहे, ज्याची किंमत 50 लाख रुपये आहे. याशिवाय कोट्यवधींचे हिऱ्यांचे दागिने आहेत, ज्यांची किंमत 3 कोटींहून अधिक आहे. कंगना महागड्या आणि आलिशान कारचीही शौकीन आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये अनेक वाहनं आहेत. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात तिन दोन गाड्यांचा उल्लेख केला आहे. यापैकी एक BMW 7-Series आहे आणि दुसरी Mercedes Benz GLE SUV आहे. या दोन्ही कारची एकूण किंमत 1.56 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.