Kangana Ranaut : हिमाचल प्रदेशातील मंडीमधून नुकतीच लोकसभा निवडणूक जिंकलेल्या अभिनेत्री कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला जवानाने मारहाण केल्याचे समोर आलं आहे. कंगनाने गंभीर आरोप केले असून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कंगनाला कानाखाली मारणाऱ्या महिला जवानाचे नाव कुलविंदर कौर असल्याचे सांगण्यात येत आहे. कंगना हिमाचलवरुन दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर आली होती.
कंगना रणौत तिच्या राजकीय प्रवासाची सुरुवात करण्यासाठी हिमाचल प्रदेशमधून निघाली होती. चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री राजकारणी बनलेली कंगना रणौत मंडी लोकसभा मतदारसंघ जिंकल्यानंतर सक्रिय राजकारणी म्हणून काम करण्यास सज्ज झाली होती. त्यानंतर आता चंदिगड विमानतळावर तिला एका महिला जवानाने कानाखाली मारल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर कंगना रणौतने विमानतळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
नेमकं काय घडलं?
कंगना रणौतने या प्रकरणाची तक्रार विमानतळ पोलिसांकडे करत महिला जवानाला नोकरीवरून काढून टाकण्याची आणि तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रणौत भाजपच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विस्तारा एअरलाइन्सच्या फ्लाइट युके ७०७ ने दिल्लीसाठी रवाना झाली होती. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता कंगना विमानतळाच्या सुरक्षा तपासणीतून बाहेर पडत असताना महिला जवानाने तिच्यावर हात उचलला आणि कानाखाली लगावली. कंगनाने याबाबत तक्रारही केली आहे. कंगनाला कानाखाली मारणाऱ्या महिला जवानाला सध्या विमानतळावर उपस्थित सुरक्षा रक्षकांनी कमांडंटच्या खोलीत बसवून ठेवले आहे. त्यानंतर कंगना दिल्लीला रवाना झाली आहे.
कंगनाला मारहाण का झाली?
माध्यमांच्या वृत्तानुसार, शेतकरी आंदोलनादरम्यान कंगना रणौतने केलेल्या वक्तव्यामुळे महिला सुरक्षा रक्षक कुलविंदर कौर नाराज होती. याच नाराजीमुळे तिने कंगनाच्या कानशिलात लगावल्याचे म्हटलं जात आहे.
दरम्यान, चंदीगड विमानतळावर कंगना रणौतसोबत अशी घटना पहिल्यांदाच घडली नाही. चार वर्षांपूर्वीही चंदीगड विमानतळावर कंगणासोबत अशीच घटना घडल्याची बातमी समोर आली होती. दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.