Kangana Ranaut on Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ २० जागाच जिंकता आल्या. कोकण, मराठवाड्यासह इतर भागात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले. या निकालाबद्दल बोलताना भाजपच्या खासदार कंगना रणौत यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. ठाकरेंना दैत्य म्हणत त्यांनी उत्तर दिले.
दिल्लीत माध्यमांशी बोलताना खासदार कंगना रणौत म्हणाल्या की, "आमच्या पक्षासाठी हा एक ऐतिहासिक विजय आहे. आम्ही सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. यासाठी महाराष्ट्र, भारतातील जनतेचे आभारी आहोत."
कोण मुख्यमंत्री झालेलं पाहायला आवडेल? या प्रश्नावर कंगना रणौत म्हणाल्या की, "आमचा पक्ष निर्णय घेईल. आमचा पक्षाची जी विचारधारा आहे, त्यामुळे आमच्याकडे नेतृत्व करण्यास एकापेक्षा एक सरस लोक आहेत."
कंगना रणौत यांनी उद्धव ठाकरेंवर काय केली टीका?
उद्धव ठाकरेंचा इतक्या वाईट पद्धतीने पराभव झाला. तुम्हाला हे अपेक्षित होतं का? असा प्रश्न कंगना रणौत यांना विचारण्यात आला होता.
कंगना रणौत म्हणाल्या की, "याची मला अपेक्षा होती, कारण मला वाटतं की, इतिहास साक्षी आहे. माझे खूप रील्सही व्हायरल होत आहेत. आम्ही दैत्य आणि देवांना कसे ओळखतो. जे महिलांची अवमान करतात, ते दैत्यच असतात आणि जे महिलांचा सन्मान करतात... महिलांना ३३ टक्के आरक्षण, शौचालये, धान्य, गॅस सिलिंडर दिले. त्यावरून कळते की, देव कोण आणि दैत्य कोण? त्यामुळे दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं. त्यांचा पराभव झाला."
"माझं घर तोडलं, मला शिव्या दिल्या"
"महाभारतात एकच कुटुंब होतं, पण फरक इतकाच होता की, जे महिलांचा अवमान करतात... माझं घर तोडलं गेलं. मला शिव्या दिल्या गेल्या. मला वाटतं की कुठे न कुठे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती, ते दिसत होतं", अशी टीका कंगना रणौत यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
"काही मूर्ख एकत्र आल्याने देशाचे तुकडे होऊ शकत नाही"
काँग्रेसवर टीका करताना कंगना रणौत म्हणाल्या, "त्यांनाही जनतेने जबरदस्त उत्तर दिले आहे. हा देश जो आहे, तो खूप बलिदानांनंतर बनला आहे. काही मूर्ख एकत्र आल्याने देशाचे तुकडे होऊ शकत नाही. आणि आम्ही होऊ पण देणार नाही", असा हल्ला कंगना रणौत यांनी केला.