बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौत या त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने अडचणीत सापडत आहेत. तसेच्या त्यांच्या वक्तव्यांवर स्पष्टीकरण देताना पक्षालाही नाकी नऊ येत आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये कंगना यांनी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांबाबत केलेल्या विधानांमुळे भाजपाची कोंडी झाली होती. त्यानंतर आज गांधी जयंती दिवशी कंगना राणौत यांनी केलेल्या एका पोस्टमुळे वादाला तोंड फुटलं आहे. या पोस्टमध्ये कंगना लिहितात की, ‘’देशाचे राष्ट्रपिता असत नाही, तर देशाचे सुपुत्र असतात. धन्य आहेत ते भारतमातेचे सुपुत्र’’. या पोस्टसोबत कंगना यांनी देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा फोटो ठेवला आहे. दरम्यान, कंगना यांच्या या पोस्टविरोधात काँग्रेसने आक्रमक प्रतिक्रिया दिली असून, त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते राजकुमार वर्मा यांनी केली आहे.
आज महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयंती आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांनी या दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली आहे. यादरम्यान, कंगना राणौत यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिले की, ‘’देशाचे राष्ट्रपिता असत नाही, तर देशाचे सुपुत्र असतात. धन्य आहेत ते भारतमातेचे सुपुत्र’’ या पोस्टखाली कंगना यांनी लालबहादूर शास्त्री यांचा फोटो शेअर केला. तसेच जय जवान, जय किसानची घोषणा देणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त शतश: नमन असे लिहिले. या पोस्टच्या पुढच्या स्लाइडमध्ये कंगना यांनी एक व्हिडीओ मेसेजही शेअर केला. स्वच्छता ही स्वातंत्र्याएवढीच आवश्यक आहे. महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या दृष्टीकोनाला आमचे पंतप्रधान पुढे घेऊन जात आहेत. दरम्यान, कंगना यांच्या या पोस्टवर काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते राजकुमार वर्मा म्हणाले की, कंगना राणौत वारंवार देशविरोधी विधानं करत आहेत. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. भाजपा त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधीजींच्या प्रतिमेवर पुष्प अर्पण करत आहेत. तर दुसरीकडे भाजपा खासदार गांधीजींविरोधात अशा गोष्टी बोलत आहेत. कंगना यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे.