मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या बयानबजीमुळे सतत चर्चेत असते. मुद्दा कुठलाही असो कंगना बोलणार म्हणजे बोलणार. महाराष्ट्राला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर कंगनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर, कंगना आणि शिवसेना वाद चांगलाच रंगला. आता, कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत, पाकिस्तानचीही स्तुती केलीय. त्यानंतर, नेटीझन्सने कंगनाला फैलावर घेतलं आहे.
कंगना आणि ट्विटर वाद हे जणू समीकरण बनलं आहे. कंगना प्रत्येक मुद्द्यावर ट्विट करत लाईमलाईटचा विषय बनते. सध्या पाकिस्तान स्टँड विथ इंडिया हा ट्विटर ट्रेंड आहे. देशातील कोरोना परिस्थितीवर पाकिस्तानने चिंता व्यक्त करत, भारताच्या मदतीसाठी तयार असल्याचं म्हटलंय. त्यानंतर, कंगनाने ट्विट करुन पाकिस्तानमधील या ट्रेंडचा आदर असल्याच म्हटलं आहे.
“पाकिस्तानात चाललेला टॉप ट्रेंड पाहून फार छान वाटलं.#PakistanStandsWithIndia... भारताचे वीर पुरूष मोदींनी दिलेल्या लसीचे त्यांनी कौतुक केले, या कठीण काळात आम्ही त्यांच्या सहानुभूतीचा आदर करतो.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनानं पाकिस्तानचं कौतुक केलंय. मात्र, तिचं हे कौतुक काही भारतीय नेटकऱ्यांना आवडलं नाही.
तापसी पन्नूवर केली टीका
कंगनाने एका ट्विटला रिप्लाय देताना हे ट्विट केले. अर्बन डिक्शनरी नामक ट्विटर पेजचा एक फोटो तिने शेअर केला. ‘तापसी पन्लू बॉलिवूड अभिनेत्री आहे. जी तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाते. तिला कंगना राणौतची सस्ती कॉपी म्हटले जाते. ती पप्पू गँगची सदस्य आहे. तापसी पन्नूला कंगनाचे वॉलमार्ट व्हर्जनही म्हटले जाते,’ असे या पेजवर लिहिले होते. या पेजचा फोटो शेअर करत, कंगनानेही तापसीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ‘हा हा हा... शी-मॅन आज खूप आनंदात असेन,’ असे तिने लिहिले.
नेटीझन्सने केलं ट्रोल
कंगनाने तापसीला ‘शी-मॅन’ म्हणणे लोकांना आवडले नाही. अनेकांनी यावरून कंगनाला फैलावर घेतले. अखेर लोकांचा हा संताप बघून कंगनाला स्पष्टीकरण द्यावे लागले. ‘शी-मॅन असणे चुकीचे आहे? तिला ही उपमा देऊन मी काय चूक केली. ही तर तिच्या खंबीर व्यक्तिमत्त्वाचे कौतुक आहे. तुम्ही नकारात्मक विचार का करता, मला कळत नाही,’अशा शब्दांत कंगनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.