- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीजेएनयूची सूडयात्रा अद्याप संपलेली नाही. सांस्कृतिक उपक्रमाच्या नावाखाली ९ फेब्रुवारी १६ रोजी अफजल गुरूच्या समर्थनार्थ कार्यक्रम करणाऱ्या ५ विद्यार्थ्यांची शिक्षा जेएनयु प्रशासनाने निश्चित केली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमार, उमर खालिद, अनिर्बानसह ५ विद्यार्थ्यांना आगामी २ सेमिस्टरसाठी निलंबित केले जाऊ शकते. शिक्षेविषयी अंतिम निर्णय विद्यापीठाचे कुलगुरू घेणार असले तरी विद्यार्थी संघाने मात्र या निर्णयाला विरोध करण्याचे ठरवले आहे. निलंबनाच्या यादीत कन्हैय्याकुमार, उमर खालिद, अनिर्बान, श्वेता राज व ऐश्वर्या अधिकारी यांची नावे घातली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पाचही जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून, त्यांना आगामी २ सेमिस्टरसाठी निलंबित केले जाऊ शकते. प्रशासनाने त्यांची फेलोशिप स्थगित करण्याचाही प्रस्ताव तयार केला आहे. शिक्षेच्या काळात हे पाचही विद्यार्थी विद्यापीठाच्या परिसरात पाहुणे विद्यार्थी म्हणून राहू शकतील. मात्र त्यांना वर्गात बसता येणार नाही व परीक्षाही देता येणार नाही. विद्यापीठाच्या आवारात साबरमती वसतीगृहासमोर ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप सध्या न्यायप्रविष्ट आहे. सध्या या तिघांची न्यायालयाने अंतरिम जामिनावर ६ महिन्यांसाठी मुक्तता केली आहे.प्रशासनाच्या या प्रयत्नांना विद्यार्थी संघाचा विरोध लक्षात घेता जेएनयूच्या प्रांगणात पुन्हा नवा संघर्ष उभा रहाण्याची चिन्हे आहेत. विद्यार्थी संघाने सोमवारी विद्यापीठात सभा घेतली. कन्हैय्याकुमारच्या अध्यक्षपदाची मुदत येत्या २/३ महिन्यात संपणार आहे. या पदासाठी कन्हैय्याकुमार दुसऱ्यांदा उभा रहाणार असल्याचे समजते. तथापि जेएनयूमधे लिंगडोह समितीच्या शिफारशीनुसार विद्यार्थी संघाच्या निवडणुका आयोजित करण्याचा घाट घातला असून, विद्यार्थी संघाने त्याला विरोध करण्याचा पवित्रा घेतला आहे.
कन्हैयासह ५ जणांचे २ सेमिस्टरपर्यंत निलंबन?
By admin | Published: April 12, 2016 2:28 AM