ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.२३ - देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमार प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना तपासाचा सद्य स्थिती (स्टेटस रिपोर्ट) सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कन्हैयाच्या जामिन अर्जावर मंगळवारी कुठलाही निर्णय होऊ शकला नाही.
स्टेटस रिपोर्ट शिवाय जामिन अर्जावर सुनावणीस न्यायालयाने नकार दिला. दिल्ली पोलिसांनी उद्या बुधवारी यासंबंधी स्टेटस रिपोर्ट सादर केल्यानंतर न्यायालय निर्णय घेणार आहे. कन्हैया कुमारवर देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे.
कन्हैयाने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस नकार देत त्याला उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले होते. दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी कन्हैयाच्या जामिनाला विरोध केला आहे.
न्यायमूर्ती प्रतिभा रानी यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीला ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थि होते. रिबेका जॉन कन्हैया कुमारचा खटला लढवत आहेत. मागच्या आठवडयात पतियाळा हाऊस कोर्टात झालेल्या हिंसाचाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.