नवी दिल्ली : जेएनयूमधील हल्ल्याच्या घटनेवरून जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांनी केंद्रसरकार आणि जेएनयूचे कुलगुरू जगदीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. कन्हैया यांनी सरकारवर आरोप करत म्हटले आहे की, सरकार विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकायला तयार नाही. तर जेएनयूमध्ये घडलेल्या घटनेला त्यांनी कुलगुरू जगदीश कुमार जवाबदार असल्याचे आरोप केले आहे. तर जगदीश कुमार यांच्याकडून जेएनयूला 'व्हॉट्सअॅप विद्यापीठ' बनवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सुद्धा कन्हैया कुमार म्हणाले.
एनडीटीव्हीच्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, जेएनयूमध्ये जेव्हापासून जगदीश कुमार यांनी पदभार स्वीकारला आहे, तेव्हापासून विद्यापीठात विविध मुद्यावरून आंदोलने सुरूच आहे. तर जेएनयूमधील विद्यार्थी फी वाढवल्याबद्दल बर्याच दिवसांपासून विरोध करत आहे. मात्र कुलगुरू जगदीश कुमार यांनी एकदाही विद्यार्थ्यांशी संवाद साधला नसल्याचे कन्हैया म्हणाले.
जेएनयूमध्ये परीक्षा सुरु असताना फी वाढीवरून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले होते. त्यामुळे विद्यापीठ बंद होते. वर्ग आणि परीक्षा सुद्धा त्या काळात होऊ शकले नाही. त्यामुळे कुलगुरू जगदीश कुमार यांनी व्हॉट्सअॅपवर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही आतापर्यंत व्हॉट्सअॅप विद्यापीठ आयकत होतो. मात्र जेएनयूच्या कुलगुरूंनी प्रत्यक्षात व्हॉट्सअॅप विद्यापीठ बनवण्याचा प्रयत्न केला असल्याचे कन्हैया कुमार म्हणाले.