पूर्णिया : संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाने प. बंगाल व ईशान्येकडील राज्ये धुमसत असताना, काल लखनऊ, मुंबईसह देशभरातील विविध भागात आंदोलन करण्यात आले.
बिहारमधील पूर्णियामध्ये सुद्धा सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. पूर्णियामधील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला.
आपल्याला सावरकरांच्या स्वप्नातील भारत बनवायचा नाही तर भगत सिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत बनवायचा आहे, असे सांगत कन्हैया कुमार यांनी पुन्हा आझादीच्या घोषणा दिल्या. तसेच, एनआरसीचा परिणाम पाहता सतर्क राहण्याचे आवाहन करत हा फक्त हिंदू-मुस्लीम असा विषय नसून संविधानाचा मुद्दा आहे. हा संघर्ष एका दिवसाचा नसून बऱ्याच दिवसांचा असल्याचे कन्हैया कुमार म्हणाले.
आज संविधानावर संकट ओढवले आहे. संविधान वाचविणे गरजेचे आहे. कोणत्याही नागरिकासोबत जात किंवा धर्माच्या आधारे भेदभाव होऊ नये, अशी संविधानाची मूळ भावना आहे. मात्र, सध्या उलट करण्यात येत आहे. ज्या लोकांना आपल्या देशाचे संविधान आवडत नाही, ते अशा काळ्या कायद्याला समर्थन करत आहेत, असा आरोप कन्हैया कुमार यांनी यावेळी भाजपावर केला.
दरम्यान, नागरिकत्व कायद्याविरोधात ईशान्येकडील राज्यांत उफाळून आलेल्या हिंसाचारानंतर येथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे सांगण्यात येत आहे. आसाम सरकारने राज्यातील कर्फ्यू हटविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, नागरिकत्व कायदा लागू केल्यानंतर बंद करण्यात आलेली इंटरनेटची ब्रॉडबँड सेवा सुद्धा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे.