नवी दिल्ली: ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद, सुष्मिता देव यासारख्या तरुण नेत्यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यानंतर आता काँग्रेसनं तरुण नेत्यांची फळी उभारण्यासाठी कंबर कसली आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातल्या (जेएनयू) आंदोलनामुळे प्रसिद्धिच्या झोतात आलेले कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात.
कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. गुजरातमध्येही काँग्रेसला एका नवा चेहरा मिळू शकतो. जिग्नेश मेवाणीदेखील काँग्रेसच्या संपर्कात असून त्यांनीही गांधींची भेट घेतली आहे. त्यामुळे बिहारपासूनगुजरातपर्यंत काँग्रेसनं नव्या चेहऱ्यांचा शोध सुरू केल्याचं दिसत आहे. यासाठी पक्षात बैठकांचं सत्र सुरू आहे. कन्हैया कुमार आणि राहुल गांधींची भेट गुप्त ठेवण्याचा शक्य तितका प्रयत्न करण्यात आला. बिहार काँग्रेसचे प्रभारी भक्त चरण दास यांनादेखील कुमार-गांधींच्या भेटीची माहिती नव्हती. 'चित्राताई व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या टॉपर, आता बदामाचा खुराक सुरू करा'
कन्हैया काँग्रेसची नैय्या पार करणार?बिहारमध्ये काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. राज्यात काँग्रेसचे केवळ १९ आमदार आहेत. बिहारमध्ये काँग्रेसची राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांसोबत युती आहे. मात्र गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली झाली नाही. त्या तुलनेत मित्रपक्षांनी चांगली कामगिरी केली. कन्हैया कुमार सातत्यानं भाजपवर टीका करतात. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. त्यांचं वत्कृत्व उत्तम आहे. त्यांची भाषणं व्हायरल होतात. त्यांच्या रॅलीला मोठी गर्दी असते. तरुणाईत त्यांचा प्रभाव आहे.
गुजरातमध्ये मेवाणी देणार काँग्रेसला हात?वरिष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनानंतर गुजरातमध्ये काँग्रेससमोर नेतृत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राजीव पटेल यांनी उत्तम काम केलं होतं. सातव यांच्यामुळेच काँग्रेसनं भाजपला जबरदस्त टक्कर दिली. मात्र त्यांचंदेखील निधन झाल्यानं गुजरातमध्ये पक्ष अडचणीत सापडला आहे.
जिग्नेश मेवाणी दलित समाजातील एक प्रमुख चेहरा आहेत. त्यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार दिला नव्हता. मेवाणींचा काँग्रेस प्रवेश आधीच झाला असता. त्यासाठीची बोलणी अहमद पटेल यांच्याकडून सुरू होती. मात्र त्यांचं अचानक निधन झालं. त्यामुळे मेवाणी आणि काँग्रेसमधील संवादाला काहीसा ब्रेक लागला.