ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ४ - कन्हैय्या कुमार सध्या फुकटची मिळणारी प्रसिद्धी उपभोगत आहे, मात्र त्याने अभ्यासात लक्ष घालावं असा सल्ला संसदीय कामकाज मंत्री वैंकय्या नायडू यांनी दिला आहे. जवाहलाल नेहरु विद्यालय (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. गुरुवारी त्याची सुटका करण्यात आली आहे.
जेएनयूमधील सर्व विद्यार्थी केंद्रीय विद्यालयात शिकत आहेत जिथे लोकांचा पैसा गुंतवला जातो. त्यांनी लोकांच्या पैसा वाया न घालवता अभ्यासात लक्ष घालावे असा सल्ला वैंकय्या नायडू यांनी दिला आहे. ते राजकारणात का पडत आहेत ? त्यांना जर राजकारणात रस असेल तर मग त्यांनी अभ्यास सोडावा आणि राजकारणात सामील व्हावं. तुमचा आवडत्या पक्षात प्रवेश करा असं वैंकय्या नायडू बोलले आहेत. कन्हैय्याच्या आवडत्या पक्षाचा संसदेत एकेरी आकडा असल्याचा टोमणाही वैंकय्या नायडू यांनी मारला आहे.