नवी दिल्ली - बिहारमध्ये या वर्षांच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याची तयारी विरोधी पक्षांकडून आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. यावेळी बिहारच्या राजकारणात दोन युवा नेते आपलं नशीब आजमावताना दिसणार आहेत. राष्ट्रीय जनता दलचे नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव आणि जेएनयू विद्यार्थी संगठनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार या दोघांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यामध्ये कन्हैयाच्या टार्गेटवर मोदी सरकार आहे. तर तेजस्वी यादव सातत्याने राज्यातील जदयू-भाजप सरकारवर टीका करत आहे.
कन्हैया आणि तेजस्वी दोघेही विरोधी पक्षातील नेते असून सध्या दोघेही एकमेकांच्या व्होट बँकेत मतांसाठी फिल्डींग लावत आहेत. कन्हैया कुमार मागील 20 दिवसांपासून बिहारमध्ये जन-गण-मन यात्रेवर आहे. एनआरसी आणि नागरिकता संशोधन कायद्याविरुद्ध कन्हैया सभा घेत आहे. कन्हैयाच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या यात्रेमुळेच तेजस्वी यादव यांना नाईलाजाने यात्रा काढणे भाग पडले आहे.
दुसरीकडे तेजस्वी यादव एनआरसी, सीएए आणि एनपीआरला विरोध दर्शवत आहे. कन्हैया यांच्या यात्रेला पाहता, तेजस्वी यादव यांनी आपल्या यात्रेत बेरोजगारीचा मुद्दा घेतला आहे. 23 फेब्रुवारी पासून त्यांची यात्रा सुरू होणार आहे. तेजस्वी यादव यांच्या यात्रेसाठी हायटेक गाडी बनविण्यात आली आहे.
दरम्यान आपआपल्या राजकीय भवितव्यासाठी जनतेत निघालेल्या तेजस्वी आणि कन्हैया या दोघांचा शत्रु भाजप आणि जदयू हेच आहेत. कन्हैयाच्या निशान्यावर केंद्रातील मोदी सरकार आहे. तर तेजस्वी यादव सातत्याने राज्यातील जदयू-भाजप सरकारला लक्ष्य करत आहे. त्याचवेळी आम आदमी पक्ष आणि प्रशांत किशोर बिहारच्या राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहारची निवडणूक आगामी काळात आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.