नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आणि कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैय्या कुमार याचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्विटरवरील सर्चमध्ये कन्हैय्या कुमार याचे अकाऊंट दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. स्टॅंडअप कॅामेडियन कुणाल कामरा यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
कुणाल कामराने एक ट्विट केले आहे. यात, डॉ. कन्हैय्या कुमारचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे आणि ते ट्विटरवर दिसतही नाही, असे म्हटले आहे. तसेच कुणाल कामरा याने आणखी एक ट्विट करत कन्हैय्या कुमारने केलेल्या शेवटच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
नेमके काय होते अखेरचे ट्विट?
कुणाल कामराने याने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमधील एका ट्विटमध्ये कन्हैय्या कुमारने लिहिले आहे की, ऐका गोडसेवाद्यांनो, त्या दहशतवाद्याची बंद खोलीत जेवढी पूजा करायची आहे, तेवढी करा. पब्लिकमध्ये तुमच्या प्रधानालाही गांधीजींसमोर झुकावे लागते. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी कन्हैय्या कुमारने हे ट्विट केले होते. मात्र, यानंतर कन्हैय्या कुमारचे ट्विटर अकाऊंट दिसायचे बंद झाले.
"ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची अधोगतीकडे वाटचाल"; अमित शाह यांची टीका
कन्हैय्या कुमारच्या नावे नवीन अकाऊंट
या घटनेनंतर कन्हैय्या कुमारचे एक नवीन ट्विटर अकाऊंट समोर आले आहे. मात्र, हे ट्विटर अकाऊंट कन्हैय्या कुमारने स्वतःहून उघडले आहे की, आणखी कोणी, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. 'माझा अकाऊंट हॅक करून शेतकरी आंदोलन रोखणार का मोदी चाचा?', असे नवीन ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले आहे.
दरम्यान, महात्मा गांधी यांच्या ७३ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. यानंतर कन्हैय्या कुमार यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका काली. अनेक युझर्सनी गलिच्छ शब्दांत प्रतिक्रियाही दिल्या. यानंतर कन्हैय्या कुमारचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे समजते.