ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 19 - सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज स्विकारण्यास नकार दिल्यानंतर कन्हैय्या कुमारने दिल्ली उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे.
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेला जवाहरलाल नेहरु विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यावर सुनावणीस नकार देत, सर्वोच्च न्यायालयाने कन्हैय्या कुमारला योग्य न्यायालयात अर्ज करण्याची सुचना केली होती. त्यानुसार कन्हैय्या कुमारने उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे.
दिल्ली सत्र न्यायालयात जीवीताला धोका असल्यामुळे आपण थेट सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केल्याचे कन्हैयाने म्हटले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्जावर सुनावणी घेतली तर उच्च न्यायालयाबद्दल चुकीचा समज लोकांमध्ये जाईल असं मत नोंदवलं होतं. सर्वोच्च न्यायालयाव्यतिरिक्त इतर न्यायालयांमध्ये परिस्थिती हाताळण्याची क्षमता नाही असं मत लोकांचं होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीला नकार दिला होता.