ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १५ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारच्या सुरक्षेत दिल्ली पोलिसांनी वाढ केली आहे. बसमध्ये गावठी पिस्तूल आणि कन्हैय्याला धमकी देणारं पत्र सापडल्यानंतर सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयएसबीटी ते जेएनयू कॅम्पसपर्यंत चालणा-या बसमध्ये हे पत्र आढळलं आहे.
हे पत्र लिहिणा-या व्यक्तीने याअगोदरही फेसबुकवरुन कन्हैय्याला धमकी दिल्याची माहिती मिळाली आहे. ड्रायव्हरला बसमध्ये बेवारस बॅग आढळल्यानंतर त्याने पोलिसांना कळवलं. पोलीस ही बॅग कोणाची आहे याचा तपास करत आहेत तसंच काही लोकांची चौकशीदेखील केली आहे.
बॅगमध्ये गावठी पिस्तूलसहित सापडलेल्या पत्रात कन्हैय्या कुमार आणि उमर खालीद ज्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती त्यांचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली आहे. पत्र लिहिणा-या व्यक्तीने याअगोदरही फेसबुकवरुन कन्हैय्याला धमकी दिली होती, 'ज्यामध्ये जेएनयू कॅम्पसमध्ये हत्यारांसहित आमची लोक हजर आहेत, कोणत्याही क्षणी त्याची हत्या करण्यासाठी तयार आहोत', असं लिहिण्यात आलं होतं.
कन्हैय्या कुमारला कॅम्पसमध्ये कोणतीही सुरक्षा देण्यात आलेली नाही. मात्र जेव्हा जेव्हा कन्हैय्या कुमार कॅम्पसमधून बाहेर पडेल तेव्हा वसंत कुंज पोलिस स्टेशनला कळवण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले आहेत. ज्यानंतर कन्हैय्याला सुरक्षा पुरवली जाईल.