ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्हय्या कुमारशी संबंधित वादग्रस्त व्हिडीयो टेप्स बनावट नसल्याचे सीबीआयच्या प्रयोगशाळेत स्पष्ट झाल्याचा दावा दिल्ली पोलीसांनी केला आहे. या कार्यक्रमाचे हिंदी वाहिनीकडून मिळवलेले फूटेज, कॅमेरा, सीडी आदी गोष्टी सीबीआयच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या होत्या.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार सीबीआच्या प्रयोगशाळेने संपूर्ण तपासणी करून 8 जून रोजी पोलीसांच्या स्पेशल सेलला अहवाल सादर केला आणि हे फुटेज अस्सल असून त्यात कोणतेही फेरफार केले नसल्याचे म्हटले आहे. सदर माहिती दिल्ली पोलीसांमधील सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने दिले आहे.
स्पेशल कमिशनर ऑफ पोलीस अरविंद दीप यांनी अहवाल मिळाल्याचे सांगितले परंतु त्यातील तपशील सांगण्यास नकार दिला. याआधी दिल्ली सरकारने सात व्हिडीयो क्लिपिंग्ज हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठवल्या होत्या, त्यावेळी दोन व्हिडीयोमध्ये फेरफार केल्याचे व अन्य अस्सल असल्याचे त्यांनी अहवालात म्हटले होते.
पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये उमर खालिद नेतृत्व करत असलेल्या गटाने भारतविरोधी घोषणा दिल्याचे म्हटले आहे. कन्हय्या कुमार, उमर खलिद व अनिर्बान भट्टाचार्य यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.