नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी कन्हैया, उमरसह जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे इतर विद्यार्थी आणि दिल्ली विद्यापीठाच्या माजी प्राध्यापकाविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून वर्ष उलटले असले तरी या प्रकरणात पोलिसांना अद्यापही आरोपपत्र दाखल करता आलेले नाही. त्यावेळी प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) देशद्रोहाचे कलम वापरल्याबद्दल पोलिसांविरुद्ध देशव्यापी आंदोलन उभे राहिले होते. आम्हाला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. फेब्रुवारी २०१६ मध्ये दाखल करण्यात आलेल्या दोन प्राथमिक माहिती अहवालांनंतर संपूर्ण दिल्लीत देशद्रोहाचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी २०१३ मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र २०१५ मध्ये संपूर्ण देशभरात देशद्रोहाचे ३० गुन्हे दाखल झाले. तथापि, दिल्लीत असा एकही गुन्हा दाखल झाला नव्हता. २०१४ मध्येही दिल्ली पोलिसांनी देशद्रोहाच्या एकाही गुन्ह्याची नोंद केली नव्हती. तथापि, या काळात देशात असे ४७ गुन्हे दाखल झाले होते.
कन्हैया, उमरविरुद्ध आरोपपत्र नाही
By admin | Published: February 10, 2017 1:16 AM