नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी या महिन्याच्या अखेरीपर्यंत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसशी संबंधित सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली. जर पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेली उलथापालथ पुढच्या काही दिवसांमध्ये पूर्णपणे संपुष्टात आली तर कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे २८ सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. सध्या, कन्हैय्या कुमारचा काँग्रेसला किती फायदा होईल, हेही तपासले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल या दोन्ही नेत्यांमध्ये आणि काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाशी मध्यस्थी करत आहेत. कारण, हार्दीक पटेलच्या काँग्रेस प्रवेशाचा पक्षाला अद्याप म्हणावा तितका फायदा झाल्याचे दिसत नाही. तर, कन्हैय्या कुमारच्या राजकीय पार्श्वभूमीचा विचार केल्यास लोकसभा निवडणुकांपेक्षा कन्हैय्याला मोठा पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे कन्हैयाच्या पक्षप्रवेशाचा काँग्रेसला फायदा होणार नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे. तर, कन्हैय्यामुळे बिहारमध्ये युवक काँग्रेसला बळ मिळेल, असे काही राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी बिहार का बेट म्हणत कन्हैय्या कुमारवर स्तुतीसुमने उधळली होती. तर, कन्हैय्या यांच्या काँग्रेस प्रवेशातही किशोर यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे समजते. कन्हैय्यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर प्रशांत किशोर हेही काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असेही जाणकारांचे मत आहे.
जिग्नेश मेवानींचाही प्रवेश होणार
मुळचा बिहारमधील असलेला कन्हैया कुमार जेएनयूमध्ये झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीमुळे चर्चेत आला होता. त्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बेगुसराय येथून भाजपा नेते गिरिराज सिंह यांना आव्हान दिले होते. मात्र तिथे त्याचा दारुण पराभव झाला होता. दुसरीकडे मागासवर्गीयांचे राजकारण करणाऱ्या जिग्नेश मेवानीने २०१७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गुजरातमधील वडगाम विधानसभा मतदारसंघामधून विजय मिळवला होता.