ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि नुकताच देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगात जाऊन आलेला कन्हैया कुमार याच्यासंदर्भात उत्तर प्रदेशातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेत्याने अतिशय खळबळजनक व वादग्रस्त विधान केले आहे. ' जो कोणी कन्हैया कुमारची जीभ छाटून दाखवेल त्याला ५ लाखांचे इनाम देण्यात येईल' अशी घोषणा उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष असलेल्या कुलदीप वर्ष्णेय यांनी केली.
कुलदीप वर्ष्णेय यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश यांनी ही माहिती दिली आहे. पक्षाचा कुलदीप वर्ष्णेय यांच्या वक्तव्याशी काही संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
' देशविरोधातील घोषणा दिल्यानंतर कन्हैया आता सर्वांना लक्ष्य करत आहे. त्याला धडा शिकवण्याची गरज आहे. त्याची जीभ छाटून देणा-या ५ लाखांचे बक्षिस देण्यात येईल' असे वर्ष्णेय म्हणाले होते.
देशद्रोहाच्या आरोपाखाली १२ फेब्रुवारी रोजी अटक झाल्यापासून कन्हैया कुमार तिहार कारागृहात होता. गुरूवार, ३ मार्च रोजी त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. दरम्यान काल दिलेल्या भाषणादरम्यान त्याने ' माझा आदर्श नव्हे संसदेवर हल्ला करणारा अफझल गुरू नव्हे तर रोहित वेमुला आह' असे स्पष्ट केले होते.