नवी दिल्ली - डाव्या संघटनांचा नेते कन्हैया कुमार आणि अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कन्हैया कुमारने, आपण काँग्रेसमध्ये का सामील झालो हे सांगितले. दिल्लीतील जेएनयु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा नेता, सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आज देशातील सर्वात जुन्या, सक्षम विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा बडा नेता बनला आहे. कन्हैय्या कुमारचा ना कोणता उद्योग आहे, ना कुठे नोकरी, तरीही त्याचा खर्च कसा भागतो, हा प्रश्न सर्वांनाच पडतो.
कन्हैय्या कुमार यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. तर, अनेकांनी बेरोगजगार असलेल्या कन्हैया कुमारच्या संपत्तीची, आणि रोजगारासंदर्भातही प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकसभा निवडणुकांवेळी कन्हैय्या कुमारच्या संपत्तीवरुन चांगलाच वाद आणि चर्चा रंगली होती. कन्हैय्या कुमारकडे उत्पन्नाचा कुठलाही स्रोत नसताना, त्यांची एकूण संपत्ती 18 कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला होता. कन्हैय्या कुमार यांनी 2019 साली बेगुसराय लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव झाला. त्यावेळी, कन्हैय्याने दिलेल्या संपत्ती विवरणपत्रानुसार, कन्हैय्या हा बेरोजगार असून त्यांच्याकडे 6 लाख रुपयांची संपत्ती होती.
निवडणुक आयोगाकडे सादर केलेल्या विवरणपत्रानुसार कन्हैय्या कुमार यांच्याकडे ना घर आहे, ना गाडी. बेगुसरायमधील बीहट या गावी त्यांची थोडी जमीन आहे, तीही त्यांना वारसा हक्काने मिळालेली आहे. त्यामुळे, कन्हैय्या यांच्या रोजगाराचे साधन काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. कन्हैय्या यांनी यापूर्वीही याची माहिती दिली आहे. त्यानुसार, कन्हैय्या यांनी लिहिलेलं 'बिहार टू तिहाड' या पुस्तकातून मिळणारी रॉयल्टी हेच कन्हैय्या यांच्या उत्पन्नाचा स्रोत आहे.
काँग्रेस वाचली नाही, तर देश वाचणार नाही
कन्हैया म्हणाला, मला वाटते, की या देशात काही लोक, केवळ लोक नाही, ते एक विचार आहेत. या देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, इतिहास, वर्तमान आणि भविष्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कुठे तरी वाचले होते, की तुम्ही सर्वप्रथम तुमच्या शत्रूची निवड करा. मित्र, अपोआप तयार होतील. तर मी निवड केली आहे. लोकशाही पक्षात आम्ही यामुळे सामील होत आहोत, कारण जर काँग्रेस वाचली नाही, तर देशही वाचणार नाही, असे आता वाटू लागले आहे.
राहुल गांधींना दिली भेट
कन्हैया म्हणाला, मी स्पष्टपणे सांगतो, की पंतप्रधान आजही आहेत, कालही होते आणि भविष्यातही होतील. पण, आज आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत फॉर्म भरत होतो, तेव्हा सहकारी जिग्नेशने एक संविधानाची प्रत आणि मी गांधी-आंबेडकर आणि भगतसिंग यांचा फोटो त्यांना भेट दिला. कारण, या देशाला आज भगतसिंगांची साथ, आंबेडकरांची समानता आणि महात्मा गांधींच्या एकतेची आवश्यकता आहे.
मोठं जहाज वाचलं पाहिजे
कन्हैया म्हणाला, जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे, तो वाचवता आला नाही, तर देशही वाचणार नाही. जर मोठे जहाज वाचले नाही, तर लहान बोटीही वाचणार नाहीत. मी जिथे जन्मलो, ज्या पक्षात मोठा झालो, त्याने मला शिकवले, लढण्याची हिम्मत दिली. मी त्या पक्षा सोबतच, अशा लाखो आणि कोट्यवधी लोकांचेही आभार मानतो, जे कुठल्याही पक्षाचे नव्हते, पण कुण्या पक्षाकडून आमच्यावर अनावश्यक आरोप झाल्यानंतर, ते आमच्यासाठी व्हॉट्सअॅपवर लढत होते. या देशाला केवळ काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते.