भाजपला मोठा धक्का बसणार! 'जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे' गाणारा गायक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 12:48 PM2024-09-08T12:48:11+5:302024-09-08T12:55:36+5:30
Kanhiya Mittal : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीदरम्यान कन्हैया मित्तलचे 'जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे' हे गाणे लोकप्रिय झाले होते.
Kanhiya Mittal : नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Assembly Election) भाजपला मोठा धक्का बसू शकतो. 'जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे' हे गाणे गाणारा सुप्रसिद्ध गायक कन्हैया मित्तल याने एक धक्कादायक घोषणा केली आहे. लवकरच तो काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट न मिळाल्याने कन्हैया मित्तल नाराज असल्याचे म्हटले जात आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीदरम्यान कन्हैया मित्तलचे 'जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे' हे गाणे लोकप्रिय झाले होते.
कन्हैया मित्तलने एबीपी न्यूजसोबत संवाद साधला. यावेळी तिकीट न मिळाल्याबद्दल काही नाराजी आहे का? असे त्याला विचारण्यात आले. यावर कन्हैया मित्तल म्हणाला की, कोणतीही नाराजी नाही, पण माझे मन काँग्रेसशी जोडले जात आहे. मी यापूर्वी कधीही कोणत्याही पक्षासाठी काम केले नाही. परंतु, मला वाटते की मी काँग्रेसमध्ये जावे. विनेश फोगटही काँग्रेसशी संबंधित आहे, तरीही तिला टीकेचा सामना करावा लागत आहे. यावरून मला असे वाटते की कुठेतरी आपण अशा पक्षात्या पाठिंब्याने तिला समर्थन दिले पाहिजे. तसेच, जर चर्चा झाली तर नक्कीच काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे कन्हैया मित्तलने सांगितले.
दरम्यान, कन्हैया मित्तलचे 'जो राम को लाये हैं, हम उनको लायेंगे' हे गाणे भाजपच्या प्रचारात खूप गाजले होते. यावरून कन्हैया मित्तलला असा सवाल करण्यात आला की, काँग्रेसनेही रामाला येण्यापासून रोखल्याचे तुम्ही म्हणाले होते, अशा स्थितीत एवढा मोठा निर्णय कसा घेतला जाऊ शकतो? यावर कन्हैया मित्तल म्हणाला, "नाही, मी असं म्हटलं नाही, उलट मी म्हटलं की, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही राम मंदिराचा निर्णय घेतला असता, तर मी त्यांच्यासाठीही गाणं गायलं असतं. मात्र, आता जाणवतंय आपण काँग्रेससोबत जायला हवं. येणाऱ्या तरुणांनीही हे समजून घेतले पाहिजे. आम्ही राम मानतो, पण असे नाही की, सगळे राम विरोधी काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेसमध्येही रामावर प्रेम करणारे लोक आहेत आणि सनातनी लोकही आहेत. सर्वांना सोबत घेऊन काम केले जाऊ शकते."