Chhattisgarh Kanker Encounter News: नक्षलवादाने ग्रासलेल्या छत्तीसगडमध्ये दोन दिवसांपूर्वी सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक झाला. ज्याप्रमाणे लष्कराने दहशतवाद्यांचा घरात घुसून त्यांचा खात्मा केला, त्याचप्राणे नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात घुसून मोठी कारवाई करण्यात आली. कांकेरमधील या चकमकीची विशेष बाब म्हणजे, ही काश्मीरमधील ऑपरेशन ऑलआउटच्या धर्तीवर पार पडली. नक्षलवाद्यांच्या घरात घुसून सुरक्षा दलांनी अनेकांना कंठस्नान घातले.
छत्तीसगडच्या निर्मितीनंतर सर्वात मोठे ऑपरेशननक्षलवादाचा गड असलेल्या छत्तीसगडमध्ये मंगळवारी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. छत्तीसगड राज्य वेगळे झाल्यानंतर, म्हणजेच तब्बल 24 वर्षांनंतर पहिल्यांदाच एकाच वेळी 29 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे, या कारवाईत सर्व कट्टर/कुख्यात नक्षलवादी मारले गेले आहेत. नक्षलवादी कमांडर आणि 25 लाखांचा इनामी शंकर राव याचाही समावेश आहे. एवढंच नाही तर नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे.
काश्मीरप्रमाणे कांकेरमध्ये कारवाईलोकसभा निवडणुकीची सुरुवात होण्यापूर्वीच नक्षलवाद्याचा तळ एका झटक्यात नेस्तनाबूत करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने दहशतवाद्यांचा खात्मा केला जातो, त्याच पद्धतीने कांकेरमध्ये नक्षलवाद्यांविरोधातील ही कारवाई करण्यात आली. कांकेर ऑपरेशन अंमलात आणण्यासाठी गेल्या आठवड्यात 10 राज्यांच्या डीजीपींसह गृह सचिव आणि आयबी प्रमुख यांच्यात बैठक झाली, ज्यामध्ये या मिशनला अंतिम मान्यता देण्यात आली होती. बैठकीत काश्मीरप्रमाणे छत्तीसगडमध्ये टार्गेट बेस्ड ऑपरेशन सुरू करण्याबाबत चर्चा झाली आणि त्यानंतर इंटेलिजन्स इनपुटच्या आधारे संपूर्ण नियोजन करण्यात आले.
नक्षलवाद्यांविरोधातील ही कारवाई यशस्वी करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी काश्मीर सिद्धांत स्वीकारला. ज्या अंतर्गत जंगलात राहणारे स्थानिक लोक आणि नक्षल मार्ग सोडलेल्या लोकांची मदत घेण्यात आली. सुमारे पाच दिवसांच्या नियोजनादरम्यान सॅटेलाईट इमेजेस आणि ड्रोनच्या सहाय्याने नक्षलवाद्यांच्या हालचालींचा सातत्याने मागोवा घेण्यात आला. तसेच, संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली आणि त्यानंतर साडेपाच तास चाललेल्या चकमकीत 29 नक्षलवादी मारले गेले. कांकेरमध्ये नक्षलवाद्यांना ठार करण्यात बीएसएफ आणि स्पेशल फोर्सेस व्यतिरिक्त जिल्हा राखीव रक्षक दलाने विशेष भूमिका बजावली.