बंगळुरु - कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी कन्नड भाषेवर जोर देत कन्नड संस्कृती रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं सांगत अमित शहा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शनिवारी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी हिंदी भाषेवरुन जर देशाला कोणती भाषा एकत्र आणू शकते ती हिंदी आहे असं वक्तव्य केलं होतं. मात्र या वक्तव्यावरुन दक्षिणेकडील अनेक नेत्यांनी विरोध दर्शविला आहे.
बी.एस येडियुरप्पा यांनी ट्विट करत सांगितले आहे की, देशात सर्व भाषा एकसमान आहेत. कर्नाटकात कन्नड ही प्रमुख भाषा आहे. आम्ही कधीच कन्नड भाषेसोबत तडझोड करणार नाही. कन्नड भाषा आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असं त्यांनी सांगितले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सांगितले होते की, 2020 मध्ये सार्वजनिक स्तरावर हिंदी दिवस साजरा केला जाईल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हिंदी भाषा अनेक प्रगती करेल. हिंदी भाषेसोबत जोडून हिंदीला जगभरात सर्वाधिक व्यापक भाषा करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं जाईल. त्यामुळे लोकांनी त्यांच्या मुलांना हिंदी भाषेत बोलण्याचं आवाहन केलं आहे. मात्र अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात विशेषत: दक्षिणेकडील राजकारण्यांनी विरोध केला आहे. या नेत्यांमध्ये भाजपा नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येदियुरप्पा यांचाही समावेश आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डीएमकेचे प्रमुख डीएमके स्टॅलिनसह अनेक नेत्यांनी विरोध दर्शविला आहे.
दाक्षिणात्य अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला करुन अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. देशात एक भाषा लादली जाऊ शकत नाही, असे झाल्यास मोठे आंदोलन होईल. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत कमल हासन म्हणाले, "1950 मध्ये भारत प्रजासत्ताक झाला, त्यावेळी वचन दिले होते की प्रत्येक क्षेत्रातील भाषा आणि संस्कृतीचा सन्मान केला जाईल आणि त्याला सुरक्षित ठेवले जाईल. त्यामुळे कोणताही शाह, सुल्तान किंवा सम्राट हे वचन अचानक तोडू शकत नाही. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या देशाच्या एकतेसाठी त्याग केला आहे. मात्र, लोक आपली भाषा, संस्कृती आणि ओळख विसरू शकत नाहीत असं त्यांनी सांगितले होते.