कानपूर – उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये बिग डेटा सॉफ्टवेअर, आयकर विभाग आणि जीएसटी रजिस्ट्रेशनच्या तपासात कानपूरमधील रस्त्यावर पाणीपुरी, वडापाव विकणारे तब्बल २५६ लोक कोट्यधीश असल्याचं समोर आल्यानं मोठी खळबळ माजली आहे. त्याशिवाय अनेक भंगार व्यवसायिकांकडे तीन-तीन अलिशान गाड्या आणि कोट्यवधीची संपत्ती असल्याचा खुलासा झाला आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आयकर विभागाच्या तपासात हैराण करणारा खुलासा बाहेर आला आहे.
शहरातील रस्त्यावर पाणीपुरी, वडापाव आणि पानविक्रेते हे कोट्यधीश असल्याचं समोर आलं. इतकचं नाही तर किराणा विक्रेते आणि किरकोळ व्यापारीही कोट्यधीश आहेत. तर फळविक्रेता शेकडो एकर जमिनीचा मालक आहे. दै. हिंदुस्तानच्या वृत्तानुसार पान, वडापाव, पाणीपुरी विक्रेत्यांसह भंगारवाल्यांकडे ही मालमत्ता असल्याचं सांगण्यात आलं आहे. भंगारवाल्यांकडे तर तीन अलिशान गाड्या आढळल्या. परंतु आयकर आणि जीएसटीचा एकही रुपया यातल्या कुणीही दिला नाही.
बिग डेटा सॉफ्टवेअर, आयकर विभाग आणि जीएसटी रजिस्ट्रेशनच्या तपासात कानपूरमधील २५६ कोट्यधीश असलेल्यांचा शोध लागला आहे. गरीब असणाऱ्या या लोकांवर अनेक दिवसांपासून आयकर विभागाची गुप्त नजर होती. आयकर विभाग केवळ इन्कम टॅक्स भरणारे आणि रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांचे मॉनिटरिंग करते असं मानलं जात होतं. तेव्हा गल्लीबोळात कोट्यवधीची मालमत्ता जमा करणाऱ्यांवरही पाळत ठेवली जात होती. जेव्हा आयकर विभागाने २५६ लोकांना पकडलं तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसला.
कसा झाला खुलासा?
कानपूरच्या या व्यापाऱ्यांनी जीएसटी आणि कराचा एकही पैसा भरला नाही परंतु ४ वर्षात ३७५ कोटींची संपत्ती खरेदी केली. ही मालमत्ता आर्यनगर, स्वरुप नगर, बिरहाना रोड, गुमटीसारख्या महागड्या परिसरात होती. इतकचं नाही तर ६५० एकर जमिनी खरेदी करून त्याचे मालक बनले होते. कानपूरच्या आर्यनगरमधील २, स्वरुप नगरमधील १, बिरहाना रोडवरील दोन पानविक्रेत्यांनी कोरोना काळातही ५ कोटींची मालमत्ता खरेदी केली होती. तर मालरोड येथे रस्त्यावरील विक्रेता महिन्याला सव्वा लाख रुपयांनी वेगवेगळ्या गाड्या भाड्याने देत आहे. तर स्वरुप नगर आणि हूलांगज येथील दोघांनी मोठी मालमत्ता खरेदी केल्याचं उघड झालं. लालबंगला येथील १ आणि बेकनगंज येथील २ भंगारवाल्यांनी गेल्या २ वर्षात १० कोटींपेक्षा अधिक संपत्ती जमा केली आहे. जीएसटी न भरणाऱ्यांमध्ये ६५ हून अधिक छोटे किराणा दुकानदार आणि औषध विक्रेत्यांचाही समावेश आहे.