उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर भागात भीषण अपघात झाला आहे. उन्नावहून परतणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने 25 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मदत व बचावकार्य सुरू केले आहे. याच दरम्यान अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांनी आता गंभीर आरोप केला आहे. रुग्णवाहिका आणि रुग्णालयात डॉक्टर नसल्याचं म्हटलं आहे. भीषण अपघातात जीव गमावणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा रुग्णालयात आम्ही आमच्या माणसांना उपचारासाठी घेऊन आलो तेव्हा तिथे कोणी डॉक्टरच नव्हते. तसेच लोकांनी अपघात झाल्यावरही रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे बाईकवरून जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं. भीतरगाव येथील सीएचसीमध्ये एक बेडवर तीन-तीन मृतदेह ठेवण्यात आले आहेत. मृतदेहांचं आता पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे.
गंभीर जखमी यात्रेकरूंवर उपचार सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, हे यात्रेकरू उन्नावमधील बक्सर येथील चंद्रिका देवी मंदिराचे दर्शन करून आपल्या गावी कोरथा येथे परतत असताना साढ पोलीस स्टेशन हद्दीतील गौशाळेजवळ ही ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. या अपघातानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना तात्काळ जवळच्या सीएचसी रुग्णालयात दाखल आले. या ठिकाणी 24 जणांना मृत घोषित करण्यात आले, तर इतर गंभीर जखमी यात्रेकरूंवर उपचार सुरू आहेत.
मदतकार्य युद्धपातळीवर सुरू
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कानपूरमधील या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना करताना, शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदतकार्य युद्धपातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"