कानपूर - संपूर्ण देशातच कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्येही कोरोना संक्रमण वाढताना दिसत आहे. येथे लोकांना रुग्णालयांत बेड मिळणेही कठीण होत आहे. अशा भयावह स्थितीत भाजप आमदार सुरेंद्र मैथानी यांनी आपले घर कोरोना संक्रमितांसाठी निःशुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे. (kanpur BJP MLA Surendra Maithani writes letter to DM for his house to convert temporary corona hospital)
यासंदर्भात मैथानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आपल्या घराचे कोरोना संक्रिमितांसाठी क्वारंटाइन सेंटर अथवा अस्थाई स्वरुपाच्या रुग्णालय रुपांतर करण्यात यावे, असे म्हटले आहे. याच बरोबर, त्यांच्या या तीन मजली घरात 113 बेड बसू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.
मैथानीही झाले होते कोरोना संक्रमित -यापूर्वी भाजप आमदार सुरेंद्र मैथानी यांनी शहरातील भाजपच्या सर्व 9 आमदारांनी एक-एक कोटी रुपयांचा निधी शहरात कोरोना रुग्णालयाला द्यावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. सुरेंद्र मैथानी यांनी म्हटले आहे, की त्यांनाही गत वेळी कोरोना संक्रमण झाले होते. साडे तीन महिन्यांच्या उपचारानंतर ते बरे झाले होते. ते म्हणाले, शहरात असे अनेक कुटुंब आहेत, जे एकाच खोलीत राहतात. अशा स्थितीत कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली, तर सर्वांनाच संक्रमण होणे निश्चित आहे.
प्रशासनाच्या चमूने सर्व्हेही केला - सुरेंद्र मैथानी यांनी म्हटले आहे, की ''अशा स्थितीमुळेच मी माझे घर कोरोना संक्रमितांना राहण्यासाठी दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर, पत्र लिहून आपले 34 रूम आणि 5 हॉल असलेले घर जिल्हा प्रशासनाला देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या चमूने त्यांच्या घराचा सर्व्हेही केला आहे. याच बरोबर, या आणीबाणीच्या स्थितीत सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी राजकारण बाजूला सारून लोकांच्या मदतीसाठी समोर यायला हवे,'' असेही मैथानी यांनी म्हटले आहे.
गेल्या 24 तासांत देशात 3,780 जणांचा कोरोनाने मृत्यू -गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,82,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,06,65,148 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2,26,188 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (5 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 82 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे.
CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!