कानपूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना प्रकृती अस्वास्थामुळे नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी कानपूरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी हवन केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी (11 जून) त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या अंगात ताप नसून त्यांना डायलेसिसवर ठेवण्यात आले होते. त्यांना मूत्रसंसर्ग झालेला नाही, असेही रात्री हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज कधी मिळणार?, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली भेटवाजपेयी यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर संध्याकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा व त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण आडवानी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. सध्या वाजपेयी यांना भेटण्याची कोणालाही मुभा नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 50 मिनिटं होते हॉस्पिटलमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्स हॉस्पिटलमध्ये सोमवारी दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मोदींनी डॉक्टरांची भेट घेऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. यादरम्यान मोदी यांनी वाजपेयी यांच्या कुटुंबीयांसोबतही बातचित केली. जवळपास 50 मिनिटं ते हॉस्पिटलमध्ये थांबले होते.