नवी दिल्ली - लग्न म्हटलं की विविध गोष्टींवरून रुसवे-फुगवे हे आलेच. अनेकदा दागिन्यांवरून भांडण होतात. काही भांडण इतकी टोकाला जातात की लग्नही मोडतं. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. कानपूरमध्ये झुमक्यासाठी एक नवरीने सप्तपदी घेतल्यानंतर सासरी जाण्यास नकार दिल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. नवरदेवाने नवरीसाठी सर्व दागिने सोन्याचे आणले होते. पण झुमके त्याने खोटे आणले होते. यामुळे नवरी रागावली.
विशेष म्हणजे हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. पोलीस अधिकाऱ्यांनी नवरीच्या घरी जाऊन दोन्ही पक्षांशी चर्चा केली. सासरी आल्यानंतर तिला सोन्याचे झुमके घेऊन देऊ, असं वचन देण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमधील एका गावात झुमक्यावरून ही घटना घडली आहे. लग्नातील सर्व विधी पार पडले. मात्र जेव्हा नवरीने सासरहून आलेले दागिने पाहिले तर त्यात झुमके खोटे होते. त्यानंतर तिने सासरी जाण्यास स्पष्ट नकार दिला.
मुलीकडच्या मंडळींनी देखील यावरून एकच गोंधळ घातला. तसेच नवरीची पाठवणी करण्यास देखील नकार दिला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. तसेच लग्नातील या प्रकाराची जोरदार चर्चा देखील रंगली. शेवटी स्वत: नवरदेव रोहीतने सांगितलं की, सर्व दागिने खरे आहेत. फक्त झुमके खोटे आहेत. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करीत दोन्ही पक्षाची समजून काढली आणि नवरदेवलाने देखील सोन्याचे झुमके देण्याचं मान्य केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.