कानपूर-
Samajwadi Attar, Piyush Jain: उत्तर प्रदेशच्या कनौरमध्ये अत्तर व्यापारी पीयूष जैन याला अखेर कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. जैनला कर चुकवेगिरी आरोपाखाली सीजीएसटी कायद्याअंतर्गत कलम ६९ खाली अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. छापेमारीत आतापर्यंत तब्बल ३५७ कोटींची रक्कम आणि दागदागिने जप्त करण्यात आले आहेत.
जीएसटी इंटेलिजन्स महानिर्देशनालय म्हणजेच डीजीजीआय आणि आयकर विभागाच्या पथकानं कन्नौजच्या अत्तर व्यापारी पीयूष जैन याच्या कानपूर येथील घरावर छापा मारला होता. यात जैन यांच्या कपाटात इतकी रक्कम सापडली होती की ती मोजण्यासाठी काऊंटिंग मशीन मागवाव्या लागल्या होत्या. एकूण ८ मशीनचा वापर करुन पैसे मोजले जात होते.
जैनने अलिकडेच ‘समाजवादी अत्तर’ लाँच केले हाेते. त्याच्या नावावर सुमारे ४० कंपन्या आहेत. त्यात काही शेल कंपन्यांचा समावेश आहे. नोटांनी भरलेल्या कपाटांमध्ये ५०० रुपयांची बंडले होती. जैन यांचे मुख्यालय मुंबईत असून, कनौज आणि कानपूर येथे कार्यालये आहेत. तेथेही छापे मारण्यात आले. जीएसटी इंटेलिजन्सने प्रथम छापे टाकले. तिथे आढळलेली रोख रक्कम पाहून कारवाईत प्राप्तिकर खात्याला सहभागी करून घेण्यात आले. जप्त रक्कम कंटेनरमधून आरबीआयमध्ये नेली.