Kanpur Cold Wave:उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये थंडीचा कहर सुरूच आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकच्या घटना रोजच समोर येत आहेत. एवढेच नाही तर थंडीमुळे जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये रुग्णांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. तसेच, कानपूरच्या कार्डिओलॉजी हॉस्पिटलमध्येही दररोज मोठ्या संख्येने हृदयाशी संबंधित रुग्ण दिसून येत आहेत.
कानपूरच्या हृदयरोग संस्थेच्या (एलपीएस हृदयरोग केंद्र) कार्डिओलॉजी विभागाने काल (गुरुवार) डेटा जारी केला आहे. यामध्ये हृदयाशी संबंधित आजारांमुळे 23 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच, ब्रेन स्ट्रोकमुळे 2 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. म्हणहेजच कानपूरमध्ये गुरुवारी थंडीच्या त्रासामुळे एकूण 25 जणांना जीव गमवावा लागला.
अटॅक का येत आहेत?कार्डिओलॉजीचे संचालक प्रोफेसर विनय कृष्णा सांगतात की, ही थंडी हृदय आणि मेंदू, दोन्हीवर परिणाम करत आहे. थंडीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा होत आहेत, त्यामुळे रक्तदाब वाढून लोकांना अटॅक येत आहेत. हृदयरोग विभागाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने 23 जणांचा मृत्यू झाला. थंडीमुळे कानपूरमध्ये परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. थंडीची लाट सुरू असून लोक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.
काळजी कशी घ्यावी?हृदय आणि मेंदूशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठी थंडीपासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉ.विनय कृष्णा सांगतात. अत्यंत आवश्यक असेल तरच घरातून बाहेर पड्याचा आणि मॉर्निंग वॉक बंद करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. त्याचबरोबर जेवणात हिरव्या भाज्या वापरा आणि पौष्टिक आहार घ्या. तसेच घरामध्ये व्यायाम आणि योगासने करा असेही त्यांनी सांगितले. हृदय, मेंदू किंवा छातीत दुखत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.